भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एक नवा सितारा मिळाला. या अष्टपैलू खेळाडूचं नाव आहे नितीश कुमार रेड्डी! 21 वर्षीय नितीशनं पर्थ कसोटीत भारतासाठी पदार्पण केलं. तो या मालिकेत चौथ्या वेगवान गोलंदाजाजी भूमिका बजावेल आणि काही धावा करेल अशी अपेक्षा होती. मात्र त्यानं अपेक्षेपेक्षा वरचढ कामगिरी केली.
नितीश कुमार रेड्डी या बॉर्डर-गावस्कर मालिकेत यशस्वी जयस्वालनंतर भारतासाठी दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज राहिला. त्यानं आपल्या फलंदाजीनं सर्वांना इतकं प्रभावित केलं की, रवी शास्त्रींसारख्या दिग्गजांनी त्याला टॉप 6 मध्ये फलंदाजीची संधी मिळावी, अशी मागणी केली.
नितीश कुमार रेड्डीच्या कामगिरीनं स्टीव्ह वॉ आणि स्टीव्ह स्मिथ यांसारख्या दिग्गज फलंदाजांची आठवण येते, ज्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात गोलंदाजी अष्टपैलू म्हणून केली होती. स्मिथचंच उदाहरण घ्या. पाकिस्तानविरुद्ध पदार्पण करणाऱ्या स्मिथला त्याच्या पहिल्या 4 कसोटींमध्ये आठव्या आणि नवव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली. त्यानं पहिल्या 10 कसोटींमध्ये 6व्या किंवा खालच्या क्रमांकावर फलंदाजी केली. या दरम्यान त्यानं पाकिस्तानविरुद्ध 3 तर इंग्लंडविरुद्ध 4 बळी घेतले.
स्मिथनं आपल्या करिअरच्या 12व्या कसोटीत 138 धावांची खेळी खेळली. यानंतर त्यानं मागे वळून पाहिलं नाही. त्यानं पुढील 6 कसोटीत 3 शतकं ठोकले. अशाप्रकारे जो खेळाडू प्लेइंग 11 मध्ये एक गोलंदाजी अष्टपैलू म्हणून जागा मिळवतो, तो आपल्या पहिल्या 18 कसोटींमध्ये 4 शतकं झळकावतो. आज स्मिथचे कसोटीमध्ये सुनील गावस्कर यांच्या बरोबरीनं म्हणजेच 34 शतकं आहेत.
नीतीश कुमार रेड्डीनं 5 सामन्यांच्या 9 डावांत फलंदाजी करताना 298 धावा केल्या. या दरम्यान त्याची सरासरी 37.25 एवढी राहिली. त्यानं मालिकेत एक शतक देखील झळकावलं आणि 4 विकेटही घेतल्या. नितीश कुमार रेड्डीच्या रुपात भारतीय संघाला एक असा फलंदाज मिळाला आहे, जो वेगवान गोलंदाजी करू शकतो. त्याच्या उपस्थितीमुळे संतुलन साधता येईल, ज्याची भारतीय संघाला गेल्या अनेक काळापासून आवश्यकता होती.
हेही वाचा –
मोहम्मद शमी फिटनेस अपडेट, इंग्लंडविरुद्धची मालिका खेळणार की नाही?
अफगाणिस्तान क्रिकेटसाठी मोठा क्षण! इतिहासातील पहिली कसोटी मालिका जिंकली
मुंबईच्या 17 वर्षीय खेळाडूचा धमाका! अवघ्या 67 चेंडूत ठोकलं शतक