झिम्बाब्वे दौऱ्यानंतर, भारतीय क्रिकेट संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा 28 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी याची श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवड होण्याची शक्यता कमी आहे.
आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यापूर्वी नितीशला ‘क्वाड्रिसेप्स’ची (मांडीच्या स्नायूंची) दुखापत झाली होती. जरी तो त्यातून सावरला असला. त्याने पुन्हा गोलंदाजी सुरू केली असली, तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्याला अद्याप संघात समाविष्ट केले जाणार नाही, असे मानले जात आहे. श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका 15 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान गॅले आणि कोलंबो येथे खेळवली जाणार आहे.
न्यू चंदीगड येथे अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाचा भाग असलेल्या नितीश कुमार रेड्डीवर सध्या बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसन प्रक्रिया सुरू आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, नितीशने गोलंदाजी पुन्हा सुरू केली आहे. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) असे वाटते की श्रीलंकेच्या मालिकेसाठी त्याचे पुनरागमन करणे घाईचे ठरू शकते.
नितीश रेड्डीची फिटनेस ही अलीकडच्या काळात भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरली आहे. त्याला हार्दिक पांड्यासाठी एक महत्त्वाचा बॅकअप पर्याय म्हणून पाहिले जात होते, परंतु वारंवार होणाऱ्या दुखापतींचा संघाच्या नियोजनावर परिणाम झाला आहे.
श्रीलंकेच्या खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहण्याची शक्यता असल्याने, बीसीसीआय नितीशला आणखी विश्रांती देण्याचा विचार करत असल्याचे समजते.
भारतीय संघात फिरकी गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंची कमतरता नाही. मानव सुथार आणि हर्ष दुबे यांना अलीकडेच संधी मिळाली असून, त्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे.
दरम्यान, वॉशिंग्टन सुंदरच्या गुडघ्याच्या दुखापतीबाबतही चिंता कायम आहे. तो सध्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. जर सुंदर या मालिकेसाठी उपलब्ध होऊ शकला नाही, तर भारतीय संघाला पर्यायी ऑफ-स्पिनरचा शोध घ्यावा लागू शकतो.






