इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून दोन्ही संघात पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेनंतर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात २३ मार्चपासून वनडे मालिका रंगणार आहे. तत्पुर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने वनडेची तयारी सुरू केली आहे. लवकरच या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला जाऊ शकतो. मात्र या संघात युवा क्रिकेटपटू देवदत्त पड्डीकल आणि पृथ्वी शॉ यांना संधी मिळणे अशक्य असल्याचे म्हटले जात आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “इंग्लंडविरुद्ध आगामी वनडे मालिकेत पड्डीकल आणि पृथ्वीची निवड केली जाणार नाही. विजय हजारे ट्रॉफी २०२१ मध्ये त्यांनी जबरदस्त प्रदर्शन केले आहे. असे असले तरीही, त्यांना भारताकडून वनडे क्रिकेट खेळण्यासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे.”
पृथ्वी शॉ आणि देवदत्त पड्डीकल आहेत फॉर्ममध्ये
भारतातील प्रसिद्ध देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा, विजय हजारे ट्रॉफी २०२१ चा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. या हंगामात मुंबई संघाचा कर्णधार असलेल्या पृथ्वीने खोऱ्याने धावा काढल्या आहेत. अंतिम सामन्यापुर्वीच्या आकडेवारीनुसार ७ सामन्यात तब्बल १८८ च्या सरासरीने ७५४ धावा केल्या आहेत. त्याने या स्पर्धेत एक द्विशतक आणि तीन शतक झळकावली आहेत.
तर कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या पड्डीकलने ७ सामन्यात ७३७ धावा चोपल्या आहेत. त्यामध्ये ४ शतके आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. पड्डीकलने या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पूनम राऊतचे बहारदार शतक! ‘या’ खास विक्रमाच्या यादीत पोहोचली तिसर्या स्थानी
आयपीएलची चुरस वाढणार, आगामी हंगामात होणार नवीन संघांचा समावेश
अर्धशतक हुकलं तरीही मिताली राज ठरली ‘विक्रमवीर’, वनडेतील मानाच्या रेकॉर्डमध्ये अव्वल