गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) गुरुवारी चुरशीच्या लढतीत नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने चेन्नईयीन एफसीला 3-3 असे बरोबरी रोखले. भरपाई वेळेत पोर्तुगालचा 28 वर्षीय स्ट्रायकर लुईस मॅचादो याने पेनल्टीवर केलेल्या गोलने नॉर्थईस्टला तारले व त्यांच्या बाद फेरीच्या आशा कायम राहिल्या.
बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. मध्यंतराच्या 2-1 अशा आघाडीनंतर नॉर्थईस्ट पिछाडीवर होता. चेन्नईयीनने दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी दोन मिनिटांच्या अंतराने दोन गोल करीत आघाडी घेतली होती, पण अखेरीस नॉर्थईस्टने भरपाई वेळेत एका गुणाची कमाई नक्की केली.
चेन्नईयीनकडून मध्य फळीतील मिझोरामचा 23 वर्षीय खेळाडू लालियनझुला छांगटे याने दोन गोल केले, तर मध्य फळीतील स्पेनच्या 37 वर्षीय मॅन्युएल लँझरॉतने पेनल्टी सत्कारणी लावली. नॉर्थईस्टकडून पदार्पणाची संधी मिळालेला मध्य फळीतील तमिळनाडूचा 28 वर्षीय इम्रान खान व आघाडी फळीतील जमैकाचा 30 वर्षीय देशोर्न ब्राऊन व लुईस मॅचादो यांनी गोल केले.
नॉर्थईस्टने 18 सामन्यांत नववी बरोबरी साधली असून सहा विजय व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 27 गुण झाले. गुणतक्त्यातील त्यांचे पाचवे स्थान कायम राहिले. या निकालामुळे आता तिसऱ्या क्रमांकाची चुरस आणखी वाढली आहे. हैदराबाद, गोवा आणि नॉर्थईस्ट यांचे प्रत्येकी 27 गुण झाले. तिन्ही संघांचे प्रत्येकी 18 सामने झाले आहेत. यात हैदराबादचा गोलफरक ८ (25-17), गोव्याचा 7 (29-22), तर नॉर्थईस्टचा 3 (27-24) असा आहे.
चेन्नईयीनला 19 सामन्यांत दहावी बरोबरी पत्करावी लागली असून तीन विजय व सहा पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 19 गुण झाले. त्यांचे आठवे स्थान कायम राहिले.
खाते आधी उघडण्यात चेन्नईयीनने बाजी मारली. आठव्या मिनिटाला आघाडी फळीतील जेकब सिल्व्हेस्टर याने ही चाल रचली. त्याच्या अप्रतिम पासवर छांगटेने अचूक फटका मारत चेंडू नेटच्या डाव्या कोपऱ्यात घालवला.
नॉर्थईस्ट युनायटेडने सहा मिनिटांत बरोबरी साधली. आघाडी फळीतील लुईस मॅचादो याने डावीकडून ही चाल रचली. त्याने मारलेला चेंडू एका प्रतिस्पर्धीला लागून उडाला. त्याचवेळी इम्रानने झेपावत हेडिंग केले आणि चेन्नईयीनचा गोलरक्षक विशाल कैथ याला चकविले. चेंडू कैथच्या उजवीकडून नेटमध्ये गेला.
मध्यंतरास दोन मिनिटे बाकी असताना चेन्नईयीनने आघाडी घेतली. गोलक्षेत्रालगत छांगटेने चेंडूवरील ताबा गमावला. याचा फायदा उठवित नॉर्थईस्टचा मध्यरक्षक खासा कमारा याने चेंडूवर ताबा मिळवित लांब फटका मारला. त्याच्या हालचालींचा अंदाज घेत ब्राऊनने घोडदौड केली. चेन्नईयीनचा बचावपटू इनेस सिपोविच याचा प्रतिकार मोडून काढत त्याने दमदार फिनिशींग केले.
नॉर्थईस्टसाठी दुसऱ्या सत्राची सुरुवात धक्कादायक झाली. छांगटेने डावीकडून आगेकूच करताच गोलक्षेत्रात नॉर्थईस्टचा बचावपटू आशुतोष मेहता याने त्याला पाडले. त्यामुळे रेफरी प्रांजल बॅनर्जी यांनी चेन्नईयीनला पेनल्टी बहाल केली. ही पेनल्टी घेताना लँझरॉत हळू धावला आणि नॉर्थईस्टचा गोलरक्षक शुभाशिष रॉय उजवीकडे झेपावताच त्याने विरुद्ध दिशेला फटका मारत पेनल्टी सत्कारणी लावली.
त्यानंतर दोन मिनिटांत चेन्नईयीनने आघाडीही घेतली. मध्यरक्षक एडवीन वन्सपॉल याच्या पासवर छांगटने फटका मारला. चेंडू नॉर्थईस्टचा बचावपटू बेंजामीन लँबॉट याच्या पायाला लागून नेटच्या दिशेने गेला. त्यामुळे शुभाशिष चकला.
भरपाई वेळेत कैथने नॉर्थईस्टचा बदली स्ट्रायकर इद्रीसा स्यीला याला पाडले. त्यामुळे नॉर्थईस्टला पेनल्टी बहाल करण्यात आली. त्यावर मॅचादोने उजवीकडे फटका मारला. कैथने दिशेचा अंदाज अचूक घेत झेप टाकली, पण चेंडू त्याच्या हाताला लागून नेटमध्ये गेला.
महत्त्वाच्या बातम्या –
आयएसएल २०२०-२१ : ओदीशावरील विजयासह एफसी गोवा संघाची बाद फेरीत स्थान मिळविण्याच्या दिशेने आगेकूच
आयएसएल २०२०-२१ : ब्लास्टर्सचा धुव्वा उडवित हैदराबाद तिसऱ्या स्थानी
आयएसएल २०२०-२१ : मुंबई सिटीला पराभवाचा धक्का देत बेंगळुरूने राखल्या बाद फेरीच्या आशा कायम