भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी (६ जुलै) झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारताच्या पुरुष टी २० संघाची घोषणा केली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील या संघातून संजू सॅमसनला वगळण्यात आले आहे. त्यामुळे एकाच चर्चेला सुरूवात झाली, ती म्हणजे त्याला विश्रांती दिली आहे का की त्याला वगळले आहे?
बीसीसीआयच्या प्रसिद्धपत्रकात आणि त्यांच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीमध्ये संजूला विश्रांती देण्यात आल्याचा उल्लेख नाही. जरी बीसीसीआय कोणाला का वगळले, याबाबत माहिती प्रसिद्ध करत नसली तरी, मात्र त्याला विश्रांती न देण्याच्या उल्लेख नसल्यामुळे चाहते आपला अंदाज लावत आहेत.
आयसीसी टी २० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेल्या संजूचा झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड करण्यात आलेली नाही. त्याच्याऐवजी कर्णधार अय्यरच्या आयपीएल संघातील सलामीवीर प्रभसिमरन सिंग याची पहिल्यांदाच भारताच्या टी २० संघात निवड झाली आहे.
संजूला संघातून वगळण्यात आले आहे, असा आता अनेकांचा समज झाला आहे. त्याला टी २० विश्वचषकानंतर केवळ तीन सामने खेळण्याची संधी मिळाली आणि त्यामध्ये त्याने निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी २० मध्ये वैभव सूर्यवंशीला संधी देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, संजूला संघातून वगळण्यात आले नाही, तर अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांच्याप्रमाणे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. निवडीमध्ये बीसीसीआयने ही माहिती जाहीर नाही केली, मात्र एका सूत्राने सांगितले की निवड समितीला युवा खेळाडूंना संधी द्यायची आहे आणि त्यामुळेच अशोक शर्मा, यश ठाकूर आणि मयंक यादव यांना संधी देण्यात आली आहे. निवड समितीला एक वेगवान गोलंदाजांची उत्तम फळी तयार करायची आहे. संजूची बाब म्हटली, तर त्याला अक्षर आणि अर्शदीपप्रमाणे विश्रांती देण्यात आली आहे.
निवड समिती सहसा छोट्या दौऱ्यात नवख्या खेळाडूंना अधिक संधी देते. याआधीही असे करण्यात आले आहे, मात्र संजूला वगळल्याने चाहते नाराज आहेत. अजित आगरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अय्यरला विश्रांती द्यायची नाही, कारण नुकतीच त्याची कर्णधार म्हणून निवड झाली आहे. तसेच उपकर्णधार तिलक वर्माला अधिक संधी द्यायची आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या टी २० मालिकेसाठी भारतीय संघ-
श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव आणि प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर).
झिम्बाब्वे दौऱ्यातील तीन सामने २३, २५ आणि २६ जुलैला हरारे येथे खेळले जाणार आहेत.






