---Advertisement---

कर्णधारपद गमावले, संघाबाहेर… तरीही सूर्याचे मन मोठे; वैभवसाठी खास संदेश लिहित अफवांना ठरवले खोटे

On: मंगळवार, जुलै 7, 2026 1:28 PM
---Advertisement---

भारताचा टी २० विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवने नुकतेच एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामार्फत त्याने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर त्याच्या निवडीबद्दल आणि भविष्याबद्दल होत असलेल्या चर्चांना सूर्यकुमारने ही खास पोस्ट करत एकप्रकारचा पूर्णविराम दिला आहे.

या पोस्टमध्ये सूर्यकुमारने भारतीय संघाला आगामी सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीसाठीही शुभेच्छा दिल्या. वैभवने नुकतेच मॅंचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी २० सामन्यामधून (४ जुलै) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

सूर्यकुमारने या पोस्टमध्ये लिहिले, “मी संपूर्ण संघासोबत खंबीरपणे उभा आहे. संघाच्या यशाचा मला खूप आनंद आहे आणि मी त्यांना नेहमीच खूप शुभेच्छा देतो. मला माहित आहे की हे खेळाडू आपली पूर्ण ताकद लावून खेळत आहेत आणि त्यांना माझा नेहमीच पूर्ण पाठिंबा असेल. वैभव, तुझा प्रवास नुकताच सुरू झाला आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घे आणि देशाचे नाव उज्ज्वल करत राहा.”

या पोस्टमधील सर्वात महत्त्वाचे म्हणजे सूर्यकुमारने सुरू असलेल्या चर्चा आणि सोशल मीडियावर पसरत चाललेल्या अफवांना खोटे ठरवले आहे. त्याने म्हटले, “माझ्या नावावर खोटेपणाने एक विधान ऑनलाईन प्रसारित होत असल्याचे माझ्या लक्षात आले. मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी असे कोणतेही विधान केलेले नाही किंवा त्याला अधिकृत मान्यता दिलेली नाही. पडताळणी न झालेल्या माहितीवर विश्वास ठेवू नका किंवा ते शेअर करू नका. माझ्या नावावर खोटेपणाने लावलेल्या शब्दांपेक्षा भारतीय क्रिकेट, माझे संघसहकारी आणि खेळाप्रती असलेला माझा पाठिंबा नेहमीच बोलका असेल.”

निवड समितीने युवा खेळाडूंना अधिक संधी देण्याची योजना आखताना सूर्यकुमारला संघातून वगळले. अद्याप त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती जाहीर केलेली नाही, मात्र त्याच्यासमोरील आव्हान खडतर आहे.

वैभवसारख्या युवा खेळाडूंवर निवड समितीने विश्वास दाखवल्याने सूर्यकुमारची संघात परतण्याची शक्यता कमी आहे. यामुळे त्याच्या नावावर अनेक खोटी विधाने पसरवली जात होती. त्यांना या आपल्या अधिकृत संदेशाद्वारे त्याने पूर्णविराम दिला आहे. त्याच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सूर्यकुमारने ११३ टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३६.३५ च्या सरासरीने ३२७२ धावा केल्या आहेत. (Suryakumar Yadav penned a special message for Vaibhav Sooryavanshi and team india also dismissing rumors as false.)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---