सार्बियाचा टेनिस स्टार नोवाक जोकोविच सध्या त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. नुकत्याच असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनलने (एटीपी) जाहीर केलेल्या ताज्या जागतिक क्रमवारीनुसार जोकोविच अव्वल क्रमांकावर कायम आहे. आता तो या आठवड्यात म्हणजेच ८ मार्चपर्यंत अव्वल क्रमांकावर कायम राहाणार आहे. त्यामुळे त्याने रॉजर फेडररच्या मोठ्या विक्रमशी बरोबरी केली आहे.
जोकोविचच्या कारकिर्दीतील हा ३१० आठवडा आहे, ज्यात तो जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे. त्यामुळे सर्वाधिक आठवड्यात जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर राहण्याच्या फेडररच्या विश्वविक्रमाशी त्याने बरोबरी केली आहे. फेडरर देखील त्याच्या कारकिर्दीत ३१० आठवडे अव्वल क्रमांकावर होता.
जोकोविच त्याच्या कारकिर्दीत सर्वात आधी ४ जुलै २०११ रोजी वयाच्या २४ व्या वर्षी अव्वल क्रमांकावर आला होता. तो कारकिर्दीत एकूण ५ वेगवेगळ्या कालावधीत अव्वल क्रमांकावर आला आहे. तसेच सलग १२२ आठवड्यात अव्वल क्रमांकावर राहण्याचा त्याचा वैयक्तिक सर्वोत्तम विक्रम आहे. ही कामगिरी त्याने ७ जुलै २०१४ ते ६ नोव्हेंबर २०१६ दरम्यान केली होती. तसेच सध्या तो ३ फेब्रुवारी २०२० पासून अव्वल क्रमांकावर कायम आहे.
याबरोबरच तो पुढील आठवड्यातही अव्वल क्रमांकावरच कायम राहणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे फेडररचा ३१० आठवडे अव्वल क्रमांकावर राहण्याचा विक्रम तो पुढील आठवड्यात मागे टाकेल.
सर्वाधिक आठवड्यात अव्वल क्रमांकावर राहाणारे टेनिसपटू
३१०* – नोवाक जोकोविच
३१० – रॉजर फेडरर
२८६ – पीट सँप्रास
२७० – इव्हान लेंडल
२६८ – जिमी कॉनर्स
जोकोविचने जिंकले नवव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद
जोकोविचने मागील आठवड्यातच रशियाच्या डॅनिएल मेदवेदेवला अंतिम सामन्यात पराभूत करत ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकले होते. त्याने ९ व्यांदा हे विजेतेपद जिंकले आहे. त्याने या विजेतेपदाबरोबर मागील आठवड्यात तो ८ मार्चपर्यंत अव्वल क्रमांकावर कायम राहिल, हे निश्चित केले होते.
जोकोविचने जिंकलेत १८ ग्रँडस्लॅम
ऑस्ट्रेलियन ओपन २०२१चे विजेतेपद हे जोकोविचचे १८ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद होते. त्यामुळे आता सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या पुरुष टेनिसपटूंच्या यादीत त्याने त्याच्यातील आणि फेडरर व नदालमधील अंतर कमी केले आहे. सध्या पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रम फेडरर आणि नदाल यांच्या नावावर संयुक्तरित्या आहे. या दोघांनी प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितसह ‘हे’ खेळाडू होऊ शकतात इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर
हरभजन सिंग बनला ‘ऍक्शन हिरो’! ‘या’ साऊथ फिल्ममध्ये दिसणार फायटिंग करताना, पाहा टीझर
धोनीला खेळताना पहायचं आहे? ‘या’ दिवशी करतोय मैदानात पुनरागमन