---Advertisement---

Australian Open: 4 तासांचा थरार! जोकोविचने सिनरला तंबी देत फायनलमध्ये धडक

On: शनिवार, जानेवारी 31, 2026 11:49 AM
---Advertisement---

यंदा 2026 मधील पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात अंतिम सामना खेळणारे दोन्ही खेळाडू निश्चित झाले आहेत. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मधील दोन्ही उपांत्य फेरीचे सामने 30 जानेवारी रोजी पार पडले. टेनिसप्रेमींना जबरदस्त थरार पाहायला मिळाला. पहिल्या उपांत्य सामन्यात स्पेनचा युवा स्टार कार्लोस अल्कारेजने दमदार कामगिरी करत विजय मिळवला आणि अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. त्यानंतर झालेला दुसरा उपांत्य सामना मात्र स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात रोमांचक ठरला.

दुसऱ्या उपांत्य फेरीत सर्बियाचा दिग्गज नोवाक जोकोविच आणि इटलीचा युवा खेळाडू जॅनिक सिनर आमनेसामने होते. या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी आपापली सर्वोत्तम खेळी सादर केली. तब्बल चार तासांहून अधिक काळ चाललेल्या या लढतीत अखेर नोवाक जोकोविचने पाच सेटपर्यंत गेलेला सामना 3-2 अशा फरकाने जिंकत अंतिम फेरीत धडक मारली.

सामन्याची सुरुवात सिनरने आक्रमक खेळीने केली. पहिला सेट त्याने 6-3 असा जिंकत जोकोविचवर दबाव निर्माण केला. मात्र अनुभवी जोकोविचने दुसऱ्या सेटमध्ये शानदार पुनरागमन करत तोही 6-3 असा आपल्या नावावर केला आणि सामना 1-1 असा बरोबरीत आणला. तिसऱ्या सेटमध्ये पुन्हा एकदा सिनरने नियंत्रण मिळवले आणि 6-4 असा सेट जिंकत आघाडी घेतली.

चौथा सेट दोन्ही खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. 38 वर्षांचा जोकोविच येथे आपल्या अनुभवाच्या जोरावर भारी पडला. त्याने संयम राखत 6-4 असा सेट जिंकला आणि सामना पुन्हा 2-2 असा बरोबरीत नेला. निर्णायक पाचव्या सेटमध्ये दोघांमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळाली, मात्र महत्त्वाच्या क्षणी जोकोविचने आपली सरसता सिद्ध करत 6-4 असा सेट जिंकला आणि अंतिम फेरीचे तिकीट मिळवले.

विशेष म्हणजे, मागील चार ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये जोकोविच उपांत्य फेरीपुढे जाऊ शकला नव्हता. मात्र ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये त्याने ही मालिका मोडीत काढत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता 1 फेब्रुवारी रोजी अंतिम सामन्यात नोवाक जोकोविच आणि कार्लोस अल्कारेज यांच्यात जेतेपदासाठी थरारक सामना पाहायला मिळणार असून, टेनिसविश्वाच्या नजरा या महामुकाबल्याकडे लागल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---