माऊंट मॉनगनुई| भारताचा न्यूझीलंड विरुद्ध तिसरा वन-डे सामना बे ओव्हल मैदानावर आज (28 जानेवारी) पार पडला असून भारताने हा सामना 7 विकेट्सने जिंकला आहे. तसेच 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
या विजयामुळे भारतीय कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यात द्विपक्षीय वन-डे मालिका जिंकणारा पहिलाच भारतीय कर्णधार बनला आहे. या सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत त्याने संघाच्या कामगिरी बरोबरच शुबमन गिल या खेळाडूचेही कौतुक केले आहे.
“मी त्याचा नेटमधील सराव बघितला आहे. त्याच्या खेळाचा स्तर बघता मी 19 वर्षाचा होतो तेव्हा 10 टक्केही त्याच्यासारखा खेळत नव्हतो”, अशा शब्दांत विराटने युवा खेळाडू शुबमन गिलचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर विराटने पृथ्वी शॉचेही उदाहरण दिले आहे. विराट म्हणाला शॉनेही मिळालेल्या संधीचे सोने केले.
तसेच विराट म्हणाला, युवा खेळाडूंमध्ये ज्या प्रकारे आत्मविश्वास आहे, तो भारतीय क्रिकेटसाठी चांगला आहे.
गिलने न्यूझीलंडमध्ये झालेल्या 19 वर्षाखालील आयसीसी विश्वचषक 2018 स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करत मॅन ऑफ दी टुर्नामेंटचा पुरस्कार पटकावला होता. तसेच त्याने सध्याच्या रणजी ट्रॉफीमध्येही चमकदार कामगिरी केल्याने संघनिवड समीतीने त्याला केएल राहुल ऐवजी भारतीय संघात स्थान दिले आहे.
विराटला न्यूझीलंड विरुद्धच्या उर्वरित 2 वन-डे सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली असल्याने गिलला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
त्याचबरोबर विराट न्यूझीलंड विरुद्धच्या 3 टी20 सामन्यांच्या मालिकेतही खेळणार नसल्याने त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–१४ वर्षांच्या कारकिर्दीत एमएस धोनीच्या बाबतीत असे तिसऱ्यांदाच घडले…
–हार्दिक पंड्याच्या पुनरागमनाबाबत विराट कोहलीने केले हे मोठे वक्तव्य
–भारताविरुद्धच्या उर्वरित वनडे सामन्यांसाठी न्यूझीलंड संघात या दोन खेळाडूंचे झाले पुनरागमन