भारताने आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशी जिंकत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. आता या दोन संघात 12 जानेवारीपासून 3 सामन्यांची वनडे मालिका पार पडणार आहे.
या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा 14 जणांचा संघ घोषित करण्यात आला आहे. या संघात वेगवान गोलंदाज पिटर सिडलचाही समावेश करण्यात आला आहे. तो ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघात तब्बल 2985 दिवसांनी पुनरागमन करत आहे. त्याने 5 नोव्हेंबर 2010 ला श्रीलंकेविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळला आहे.
त्याचा जेव्हा 2015 च्या विश्वचषकावेळी ऑस्ट्रेलिया संघात समावेश करण्यात आला नव्हता तेव्हा त्याने विचार केला होता की कदाचीत त्याची ती विश्वचषकात खेळण्याची शेवटची संधी होती. पण आता त्याचा 2019 च्या विश्वचषकाला पाच महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला असताना ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघात समावेश झाला आहे.
त्याने cricket.com.au बोलताना सांगितले होते की त्याने 2015 नंतर विश्वचषकाचा विचार केलेला नाही.
तो म्हणाला, ‘ती(2015 विश्वचषक) माझी शेवटची संधी होती, असा मी विचार केला होता. पण आत्ता मी जिथे आहे तेथून आता मला मिळालेल्या संधीचे सोने करायचे आहे. चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करायचा आहे.’
‘मला जर विश्वचषकात संधी मिळाली तर मला आवडेल. मी माझ्या कारकिर्दीत बऱ्याच गोष्टी खेळलो आहे. पण मी फक्त विश्वचषकात खेळलेलो नाही.’
पिटर सिडलने त्याचे ऑस्ट्रेलिया वनडे संघातील पुनरागमन हे अनपेक्षित असल्याचेही म्हटले आहे. तो म्हणाला, ‘मी काही आठवड्यांपूर्वी माझा 34 वा वाढदिवस साजरा केला आणि मी मागील काही वर्षे वनडे खेळलोही नव्हतो. त्यामुळे तूम्हाला अशी संधी पुन्हा मिळल्यावर चांगले वाटते. ‘
‘नक्कीच मी कष्ट घेतले आहेत आणि माझा मर्यादीत षटकांचा खेळ सुधारावा यासाठी अनेक प्रयत्न केले आहे. पण ते सर्व बीबीएलमध्ये अॅडलेड स्ट्रायकर्स संघाकडून चांगल्या कामगिरीसाठी केले. मी मला वनडे क्रिकेटमध्ये संधी मिळेल याचा जास्त विचारही केला नव्हता.’
‘एखाद्या युवा खेळाडूला पहिल्यांदा संघात स्थान दिल्यावर जसे भारवल्यासारखे होते, तसेच आत्ता मला वाटत आहे. मला असे वाटत आहे की मी पुन्हा नवीन सुरुवात करत आहे.’
पिटरने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत 17 वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने 15 विकेट्स घेतल्या आहेत. तर 64 कसोटी सामने खेळले असून यात 214 विकेट्स घेतल्या आहेत.
पिटर बरोबरच उस्मान ख्वाजा, नॅथन लायन यांनीही ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघात पुनरागमन केले आहे. त्याचबरोबर झे रिचर्डसन, जेसन बेर्हेनडॉर्फ आणि बिली स्टॅनलेक यां वेगवान गोलंदाजांचाही ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघात समावेश करण्यात आला आहे.
या ऑस्ट्रेलिया वनडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी ऍरॉन फिंचकडे असेल तर उपकर्णधारपद मिशेल मार्श आणि ऍलेक्स कॅरे सांभाळतील.
ही वनडे मालिका 12,15 आणि 18 जानेवारीला अनुक्रमे सिडनी, अॅडलेड आणि मेलबर्न येथे रंगणार आहे.
भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ-
ऍरॉन फिंच(कर्णधार), उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पिटर हँड्सकॉम्ब, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनीस, मिशेल मार्श(उपकर्णधार), ऍलेक्स कॅरे(उपकर्णधार), झे रिचर्डसन, बिली स्टॅनलेक, जेसन बर्हेनडॉर्फ, पिटर सिडल, नॅथन लायन, ऍडम झम्पा.
महत्त्वाच्या बातम्या-
–…आणि चेतेश्वर पुजाराला नाचावे लागले, पहा व्हिडिओ
–सौरव गांगुलीच्या त्या खास विक्रमाचीही किंग कोहलीने केली बरोबरी
–९ पैकी ८ संघाविरुद्ध विदेशात खेळलेल्या कसोटी मालिकेत भारताने मिळवला आहे विजय…