गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमातील पहिल्या विजयाची प्रतिक्षा ओदिशा एफसीने अखेर गुरुवारी संपुष्टात आणली. ओदिशाने केरला ब्लास्टर्सवर 4-2 असा प्रभावी विजय मिळविला. आघाडी फळीतील ब्राझीलच्या 29 वर्षीय दिएगो मॉरीसिओने दोन गोलांसह विजयात सिंहाचा वाटा उचलला.
बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. 11 संघाच्या लिगमध्ये शेवटच्या दोन स्थानांवर असलेल्या संघांमधील ही लढत होती. त्यात ओदिशाने बाजी मारली, पण त्यांचे अखेरचे स्थान कायम राहिले.
आघाडी फळीतील ऑस्ट्रेलियाच्या 25 वर्षीय जॉर्डन मरे याने सातव्याच मिनिटाला ब्लास्टर्सचे खाते उघडले होते. ओदिशाला 22व्या मिनिटाला ब्लास्टर्सच्या जीक्सन सिंगच्या स्वयंगोलमुळे बरोबरी साधता आली. त्यानंतर पुर्वार्धातील तीन मिनिटे बाकी असताना बचाव फळीतील ब्रिटनच्या 34 वर्षीय स्टीव्हन टेलरने ओदिशाला आघाडी मिळवून दिली. मध्यंतराच्या या 2-1 अशा आघाडीत हुकमी स्ट्रायकर दिएगो मॉरीसिओ याने दोन गोलांची भर घातली. दुसऱ्या सत्रात त्याने दहा मिनिटांच्या अंतराने दोन गोल केले. ब्लास्टर्सकडून आघाडी फळीतील इंग्लंडचा बदली स्ट्रायकर गॅरी हुपर याने संघाचा दुसरा गोल केला. त्यावेळी 11 मिनिटांचा खेळ बाकी होता, पण ब्लास्टर्सला आणखी भर घालता आली नाही.
ओदिशाने 9 सामन्यांत पहिलाच विजय मिळवला असून दोन बरोबरी व सहा पराभव अशा कामगिरीसह त्यांचे पाच गुण झाले. ब्लास्टर्सला 9 सामन्यांत पाचवी हार पत्करावी लागली असून एक विजय व तीन बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे सहा गुण व शेवटून दुसरे म्हणजे दहावे स्थान कायम राहिले.
मुंबई सिटी एफसी 9 सामन्यांतून 22 गुणांसह आघाडीवर आहे. एटीके मोहन बागानचा दुसरा क्रमांक असून 9 सामन्यांतून त्यांचे 20 गुण जमले आहेत. तिसऱ्या क्रमांकावरील एफसी गोवा संघाच्या खात्यात दहा सामन्यांतून 15 गुण जमले आहेत. जमशेदपूर एफसी चौथ्या क्रमांकावर असून त्यांनी 9 सामन्यांतून 13 गुण मिळवले आहेत.
खाते उघडण्याची शर्यत ब्लास्टर्सने जिंकली. सातव्या मिनिटाला मिळालेली फ्री किक आघाडी फळीतील फॅक्युंडो पेरीरा याने घेतली. मैदानाच्या मध्यापासून त्याने मारलेल्या चेंडूचा ओदिशाच्या बचाव फळीला अंदाज आला नाही. याचा फायदा उठवत ब्लास्टर्सचा मध्यरक्षक के. पी. राहुल याने हेडिंग केल्यानंतर चेंडू ओदिशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग याच्या उजव्या बाजूला आला. अर्शदीपने झेप टाकत चेंडू थोपवला, पण रिबाऊंडवर मरेने डाव्या बाजूला फटका मारत लक्ष्य साधले.
ओदिशाने 15 मिनिटांत बरोबरी साधली. मध्य फळीतील जेरी माहमिंगथांगा याने चाल रचली. त्याने हवेतून मारलेला चेंडू कौशल्याने मिळवताना मॉरीसिओने ब्लास्टर्सचा बचावपटू अब्दूल हक्कू याला चकवले. त्याने मारलेला चेंडू ब्लास्टर्सचा बचावपटू जीक्सन सिंग याच्या पायाला लागून नेटमध्ये गेला त्यावेळी गोलरक्षक अल्बिनो गोम्स हा सुद्धा चकल्याने त्याला काहीही करता आले नाही.
त्यानंतर पूर्वार्धातील तीन मिनिटे बाकी असताना माहमिंगथांगा याने फ्री किकवर चेंडू बॉक्समध्ये मारला. त्यावेळी टेलरला मार्किंग करण्याकडे ब्लास्टर्सच्या बचाव फळीचे दुर्लक्ष झाले. याचा फायदा उठवित टेलरने अचूक टायमिंगसह फिनिशींग केले.
दुसऱ्या सत्रात ओदिशाने दमदार प्रारंभ केला. माहमिंगथांगा याने उजवीकडून आगेकूच केली. त्याचा अंदाज घेत मॉरीसिओ याने घोडदौड केली. माहमिंगथांगा याचा क्रॉस पास मिळताच मॉरीसिओने पहिल्या प्रयत्नात चेंडूवर ताबा मिळवित बॉक्समध्ये प्रवेश केला आणि मग पुढील फटका मारत शानदार फिनिशींग केले.
त्यानंतर तासाभराच्या खेळाच्या टप्प्यास मध्यरक्षक नंदकुमार शेखर याने डावीकडून मुसंडी मारली. त्यावेळी मॉरीसिओने ब्लास्टर्सचा बदली मध्यरक्षक प्रशांत करुथादाथ्कुनी याच्या प्रयत्नांना दाद लागू दिली नाही. चेंडूवर ताबा मिळवित त्याने कौशल्याने फटका मारला आणि चेंडू नेटच्या उजव्या कोपऱ्यात मारत लक्ष्य साधले.
संबधित बातम्या:
– आयएसएल २०२०-२१ : थरारक लढतीत ईस्ट बंगाल-गोवा यांची बरोबरी
– आयएसएल २०२० : बेंगळुरूला गारद करीत मुंबई सिटीची आघाडीवर मुसंडी
– आयएसएल २०२० : हैदराबादचा चेन्नईयीनवर दणदणीत विजय