पुणे, 4 सप्टेंबर 2022: पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेत अत्यंत चुरशीच्या सामन्यात सूरज लांडेच्या सनसनाटी स्काय डाईव्हच्या जोरावर ओडिशा जगरनट्स संघाने तेलगु योद्धाज संघाचा 46-45 असा पराभव करताना विजेतेपद संपादन केले.
शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडलेलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात तेलगु योद्धाज संघाने 41-27 अशी आघाडी घेताना या सत्रात 21 गुणांची कमाई केली होती. परंतु सचिन भार्गोने 2.44मिनिटे सरंक्षण करताना ओडिशासंघाला 2बहुमोल बोनस गुण मिळवून दिले. तरीही सामना संपण्यास केवळ 1मिनिटे 24 सेकंद बाकी असताना तेलगु योद्धाज संघाकडे 45-43अशी आघाडी होती.
याचवेळी तेलगु योद्धाजच्या आक्रमणाची 3.03मिनिटे संरक्षण करून कसोटी पाहणाऱ्या सूरज लांडेने केवळ 14सेकंद बाकी असताना अफलातून स्काय डाईव्हवर तेलगू योद्धाजच्या अवधूत पाटील ला बाद करून आपल्या संघाला 3निर्णायक गुण मिळवून दिले. या 3गुणांमुळेच ओडिशा जगरनट्सने ही अंतिम लढत 46-45 अशी केवळ 1गुणांच्या फरकाने जिंकत विजेतेपद पटकावले.
सूरज लांडेने ओडिशाकडून 9 गुण मिळवताना विजयात मोलाचा वाटा उचलला. तर रोहन शिंगाडेने 11गुण मिळवून तेलगु योद्धाज कडून कडवी झुंज दिली.
त्याआधी बॉलिवूड गायक मोहित चौहानने राष्ट्रगीताचे गायन करून अंतिम लढतीला प्रारंभ करून दिला. यावेळी 2021 जागतिक हिपहोप डान्स स्प्सर्धेत कांस्य पदक मिळवणाऱ्या लायन्स ग्रुपने आपल्या परफॉर्मन्स लने उपस्थितांची माने जिंकली.
ओडिशा जगरनट्सने नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारल्यावर विशालने 4मिनिटे 23 सेकंद संरक्षण करताना ओडिशाला 8 बोनस गुण मिळवून दिले, तर कर्णधार दिपेश मोरे आणि दिलीप खांडवी यांनी 2.37मिनिटे नाबाद राहताना 2गुणांची भर घातल्यामुळे ओडिशाने पहिल्या सत्राअखेर तेलगु योद्धाज 10-10असे बरोबरीत रोखले.
सरंक्षनात 100गुण मिळवणरा पहिला संघ ठरलेल्या तेलगु योद्धाजने दुसऱ्या सत्रात आदर्श मोहितेच्या 4.12मिनिटे संरक्षनाच्या जोरावर 8 बोनस गुण मिळवताना ओडिशा ला 13गुणांवर रोखले होते.तरीही ओडिशाने 23-20अशी पहिल्या डावा अखेर आघाडी घेतली होती. त्यानंतर तिसरऱ्या सत्रातील आघाडी कायम राखताना तेलगु योद्धाजने आगेकूच केली. परंतु सूरज लांडेच्या कामगिरी मुळे ओडिशाने अखेर बाजी मारली.
स्पर्धेतील विजेत्या ओडिशा जगरनट्स संघाला 1कोटी रुपयांचे पारितोषिक व प्रतिष्ठेचा करंडक देण्यात आला, तर उपविजेत्या तेलगु योद्धाजला 50लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तिसऱ्या स्थानावरील गुजरात जायंट्सला 30लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.