---Advertisement---

भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवत मर्फीचा पदार्पणात राडा, बनला ‘असा’ विक्रम करणारा चौथाच ऑस्ट्रेलियन

On: शुक्रवार, फेब्रुवारी 10, 2023 3:38 PM
Todd-Murphy
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळला जात आहे. गुरुवारपासून (दि. 9 फेब्रुवारी) खेळल्या जात असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या डावात खास कामगिरी करू शकला नाही. त्यांना 177 धावांवर डाव गुंडाळावा लागला. मात्र, त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाविरुद्ध गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाचा फिरकीपटू टॉड मर्फी चांगलाच चमकला. त्याने पदार्पणातच असा काही कारनामा केला की, थेट खास विक्रमाच्या यादीत त्याचा समावेश झाला.

झाले असे की, ऑस्ट्रेलिया संघाचा डाव संपल्यानंतर भारतीय संघ फलंदाजीला आला होता. यावेळी कसोटीचा पहिलाच दिवस होता. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा पदार्पणवीर फिरकी गोलंदाज टॉड मर्फी (Todd Muphy) याने भारतीय सलामीवीर केएल राहुल याला 23व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर स्वत:च झेलबाद केले. ही त्याची कसोटी कारकीर्दीतील पहिली विकेट ठरली. यानंतर त्याने दुसरी विकेट 41व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर भारतीय फलंदाज आर अश्विन याच्या रूपात घेतली. त्याने अश्विनला पायचीत बाद केले.

तिसऱ्या विकेटच्या शोधात असताना त्याने भारतीय ‘डिपेंडेबल फलंदाज’ चेतेश्वर पुजारा याला फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्याने 44व्या षटकातील पहिल्या चेंडूवर पुजाराला स्कॉट बोलँडच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर भारताचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्याने ऍलेक्स कॅरे याच्या हातून विराटला 53व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद केले. यानंतर त्याने भारताकडून पदार्पण करणाऱ्या केएस भरत याला 84व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पायचीत बाद केले. अशाप्रकारे भरत हा त्याची पाचवी विकेट ठरला.

मर्फीचा विक्रम
या 5 विकेट्स घेताच मर्फी याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. मर्फी हा ऑस्ट्रेलिया संघाकडून कसोटी पदार्पणात 5 विकेट्स घेणारा चौथा खेळाडू ठरला. त्याच्यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत अशी कामगिरी सर्वप्रथम पीटर टेलर (Peter Taylor) याने केली होती. त्याने 1986/87दरम्यान सिडनी येथे इंग्लंडविरुद्ध खेळताना विकेट्सचे पंचक पूर्ण केले होते. त्याने 78 धावा खर्च करत 6 विकेट्स घेतल्या होत्या. या यादीतील दुसऱ्या स्थानावर फिरकीपटू जेसन क्रेझा (Jason Krejza) आहे. त्याने 2008/09मध्ये नागपूर येथे भारताविरुद्ध खेळताना 215 धावा खर्च करत 8 विकेट्स घेतल्या होत्या.

यानंतर यादीत तिसऱ्या स्थानी नेथन लायन (Nathon Lyon) हा फिरकीपटू आहे. त्याने 2011मध्ये गाले येथे श्रीलंकाविरुद्ध खेळताना 34 धावा खर्च करत 5 विकेट्स घेतल्या होत्या. या यादीत आता मर्फीदेखील सामील झाला आहे. (Off spinners taking 5-fer for Australia on Test debut)

कसोटी पदार्पणात विकेट्सचे पंचक पूर्ण करणारे ऑस्ट्रेलियन फिरकीपटू
6/78- पीटर टेलर, विरुद्ध- इंग्लंड (सिडनी- 1986/87)
8/215- जेसन क्रेझा, विरुद्ध- भारत (नागपूर- 2008/09)
5/34-  नेथन लायन, विरुद्ध- श्रीलंका (गाले- 2011)
5/66- टॉड मर्फी, विरुद्ध- भारत (नागपूर- 2022/23)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बुडत्याचा पाय खोलात! चालू सामन्यात ऑस्ट्रेलियाला धक्का, दुखापतीने प्रमुख फलंदाज हॉस्पिटलमध्ये
भारतीय क्रिकेटचा ‘रेकॉर्डपुरूष’ ठरला हिटमॅन! धोनी-विराटला न जमलेली कामगिरी दाखवली करून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---