आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धा सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळली जात आहे. या स्पर्धेत प्रथमच विक्रमी 20 संघ सहभागी झाले असून यामुळे अनेक छोट्या संघांना मोठ्या स्तरावर आपलं कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली आहे. स्पर्धेत संघांची संख्या वाढल्याने खेळाडूंची संख्याही वाढली आहे. यावेळी अमेरिका, कॅनडा, पापुआ न्यू गिनी आणि युगांडा हे देश प्रथमच स्पर्धेत सहभागी होत आहेत.
जरी या विश्वचषकात अनेक तरुण खेळाडू खेळत असले, तरी काही वयस्कर खेळाडूही आपली प्रतिभा दाखवत आहेत. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला विश्वचषकातील अशा 4 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त आहे.
(1) फ्रँक न्सुबुगा – युगांडा (43 वर्षे 288 दिवस)
युगांडाचा अष्टपैलू खेळाडू फ्रँक न्सुबुगा हा 2024 टी20 विश्वचषक स्पर्धेत खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. त्यानं 2019 मध्ये त्याच्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. पापुआ न्यू गिनीविरुद्धच्या विजयात न्सुबुगानं मोलाची भूमिका बजावली होती. त्यानं स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात किफायतशीर स्पेल (4 षटकांत 4 धावा देत 2 बळी) टाकला होता. या दरम्यान त्यानं तब्बल 20 चेंडू निर्धाव टाकले होते.
(2) नसीम खुशी – ओमान (41 वर्षे, 305 दिवस)
या यादीत दुसरं नाव नसीम खुशीचं आहे. ओमानच्या या यष्टिरक्षक फलंदाजाचं वय 41 वर्ष 305 दिवस आहे. नसीम हा पाकिस्तानी वंशाचा खेळाडू आहे, पण तो ओमानकडून खेळतो. त्यानं आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 32 एकदिवसीय आणि 51 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
(3) मोहम्मद नदीम – ओमान (41 वर्षे 281 दिवस)
या यादीत मोहम्मद नदीम हा आणखी एक ओमानी खेळाडू आहे. नदीमचा जन्म 4 सप्टेंबर 1982 रोजी पाकिस्तानातील सियालकोट येथे झाला. त्यानं 2015 मध्ये ओमानकडून टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. नदीमनं आतापर्यंत 53 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ओमानचं प्रतिनिधित्व केलं असून यात त्यानं 489 धावा केल्या आहेत. याशिवाय त्यानं 30 बळीही घेतले आहेत.
(4) वेस्ली बॅरेसी – नेदरलँड्स (40 वर्षे 39 दिवस)
या यादीत चौथं नाव आहे नेदरलँडच्या वेस्ली बॅरेसीचं. बॅरेसी हा नेदरलँड्ससाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. मात्र त्याला या टी20 विश्वचषकात अद्याप एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याच्या नावे नेदरलँडसाठी 46 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 812 धावा आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
या 3 मोठ्या संघांवर विश्वचषकातून बाहेर पडण्याचा धोका! अमेरिका अन् अफगाणिस्तान सुपर-8 मध्ये जातील का?
बांग्लादेशच्या खेळाडूचे पंचांवर गंभीर आरोप, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर सुरू झाला नवा वाद
3 खेळाडू ज्यांना शिवम दुबेच्या जागी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते