---Advertisement---

“विराट विरुद्ध खेळताना साधी सोपी रणनिती”, ऑली रॉबिन्सनने केला खुलासा

On: रविवार, ऑगस्ट 29, 2021 1:45 AM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना हेडिंग्लेच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघावर १ डाव आणि ७६ धावांनी विजय मिळवला. याबरोबक इंग्लंडने मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात ऑली रॉबिन्सनने सर्वाधिक ५ गडी बाद केले होते, ज्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

रॉबिन्सनने दुसऱ्या डावात भारताचा कर्णधार विराट कोहलीला देखील बाद केले होते. दरम्यान, सामना झाल्यानंतर त्याने विराट कोहलीला बाद करण्यासाठी कुठल्या रणनीतीचा अवलंब केला याचा खुलासा केला आहे.

इंग्लंड संघाने पहिल्या डावात ३५४ धावांची आघाडी घेतली होती. प्रत्युत्तरात भारतीय संघाचा दुसरा डाव २७८ धावांवर संपुष्टात आला होता. यादरम्यान चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक ९१ धावांची खेळी केली. तर, कर्णधार कोहलीने ५५ धावांचे आणि रोहित शर्माने ५९ धावांचे योगदान दिले. विराटला ९० व्या षटकात ऑली रॉबिन्सनने जो रूटच्या हातून झेलबाद करत माघारी धाडले.

सामना झाल्यानंतर रॉबिन्सनने म्हटले की, “खरं सांगू, तर इंग्लंड संघासाठी पहिल्यांदा सामनावीर पुरस्कार जिंकणे हे माझे स्वप्न आहे. मी इथे गोलंदाजी करायचा आनंद घेतला आणि येथील परिस्थितीशी जुळवून घेऊन मला गोलंदाजी करताना बरे वाटले. त्यामुळे मला ५ गडी बाद करून खूप आनंद होत आहे.”

“अँडरसन सोबत गोलंदाजी करणे आणि त्यांच्याकडून शिकणे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे माझ्या खेळात खूप बदल जाणवला आहे. मी नेहमी शिकत असतो आणि आणखी चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असतो.”

विराटला बाद करण्याबाबत रॉबिन्सन म्हणाला…
विराटला बाद करण्याच्या रणनीतीचा खुलासा करत ऑली रॉबिन्सन म्हणाला, “विराटने मला दोन चौकार मारले, त्यानंतर मी त्याला बाद केले होते. विराट विरुद्ध खेळताना साधी सोपी रणनिती आहे. चौथ्या आणि पाचव्या यष्टीवर गोलंदाजी करायची. मी ज्या अँगेलने गोलंदाजी करत होतो, त्यावरून मला वाटत होते की, बॅटचा कडा लागणार आणि तसेच झाले.”

रॉबिन्सनने तिसऱ्या सामन्यात एकूण ७ गडी बाद केले. दुसऱ्या डावात रॉबिन्सनने ९० व्या षटकाचा अखेरचा चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेने टाकला आणि तोच चेंडू विराटच्या बॅटचा कडा घेत जो रुटच्या हातात गेला. विराटने या डावात ५५ धावांची खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या – 

“आमच्यावरील दबाव वाढला होता”, दारुण पराभव पत्करल्यानंतर कर्णधार कोहलीची कबुली

ओव्हल कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार बदल, कर्णधार कोहलीचे संकेत

ऍशेस २०२१-२२ वर प्रश्नचिन्ह; मालिकेपूर्वी ‘या’ कारणामुळे इंग्लंडचे १० खेळाडू घेऊ शकतात माघार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---