लीड्स। इंग्लंडने भारताविरुद्ध हेडिंग्ले येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शनिवारी (२८ ऑगस्ट) १ डाव आणि ७६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडच्या या विजयात ऑली रॉबिन्सन आणि जेम्स अँडरसन या दोन वेगवान गोलंदाजांना मोलाचा वाटा उचलला. तसेच त्यांनी फेकलेल्या वॉबल बॉल्सने भारतीय फलंदाजांना चांगलेच अडचणीत टाकले होते. याबद्दल रॉबिन्सनने भाष्य केले आहे.
रॉबिन्सन ठरला सामनावीर
या सामन्यात रॉबिन्सनने पहिल्या डावात १० षटकांत १६ धावा देत २ विकेट्स घेतल्या होत्या, तर दुसऱ्या डावात त्याने २६ षटकांत ६५ धावा देत सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. त्याच्या याच कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.
दरम्यान, या सामन्यातील त्याचे वॉबल बॉल चर्चेचा विषय ठरला. आता याबद्दल त्याने सांगितले आहे की त्याने अँडरसनची यासाठी मदत घेतली होती. अनुभवी गोलंदाज अँडरसन वॉबल बॉल टाकण्यात माहिर आहे.
“अँडरसनची घेतली मदत”
हेडिंग्ले कसोटी संपल्यानंतर रॉबिन्सनने सांगितले की ‘मी अँडरसनला ‘वॉबल ग्रिप’ वेगळ्या प्रकाराने पकडताना पाहिले. मी ती वेगळ्याप्रकारे पकडत होतो. त्यामुळे मी त्याच्याशी चर्चा केली आणि नंतर नेट्समध्ये त्याचा सराव केला. हा सराव चांगला होता. त्यामुळे मी त्याचा वापर सामन्यात केला आणि त्याचा फायदाही झाला. ही अशी गोष्ट आहे, ज्याला मला अजून थोडा सराव करावा लागणार आहे. मला माझ्या कारकिर्दीत मिळालेली ही शिकण्याची संधी खूप महत्त्वाची आहे आणि सौभाग्याने ती आज आली आहे.”
तसेच रॉबिन्सन म्हणाला, ‘नक्कीच, अँडरसनसह गोलंदाजीची सुरुवात करणे आणि दोन्ही बाजूंनी दबाव बनवणे शानदार होते. मी गोलंदाजीचा आनंद घेतला आणि आशा आहे की हे कायम होईल.’ ‘वॉबल बॉल’ टाकताना गोलंदाजाची बोटे चेंडूच्या शिवणीवर सामन्यपेक्षा अधिक पसरलेले असतात.
विराटला बाद करणे अविश्वसनीय अनुभव
भारताच्या प्रमुख फलंदाजांच्या विकेट्स घेणारा रॉबिन्सन पुढे म्हणाला, ‘हा खूप खास दिवस होता. अजूनही विजयाचा आनंद कमी झालेला नाही. माझ्यासाठी माझ्या कारकिर्दीतील आनंददायी दिवसांपैकी एक होता. माझ्या कारकिर्दीतील पहिला कसोटी विजय मिळवणे विशेष होते.’
रॉबिन्सनने हेडिंग्ले कसोटीत दुसऱ्या डावात रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रिषभ पंत आणि इशांत शर्मा यांच्या विकेट्स घेतल्या होत्या. यातील विराटची विकेट खास असल्याचे रॉबिन्सनने सांगितले.
तो म्हणाला, “ही खूप विशेष भावना आहे. प्रेक्षकांचा पाठिंबा अप्रतिम होता. जेव्हा विराटची विकेट घेतली तेव्हा त्यांनी जोरजोरात आनंद व्यक्त केला. त्याची विकेट घेणे हा अविश्वसनीय अनुभव होता.”
तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा १ डाव आणि ७६ धावांनी पराभव
तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांवर संपुष्टात आला होता. प्रत्युत्तरात जो रूटच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने ४३२ धावांचा डोंगर उभारला होता. यासह पहिल्या डावात ३५४ धावांची आघाडी घेतली होती.
त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली होती. रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली या तिघांनी अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाला पुनरागमन करून दिले होते. परंतु, इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. परिणामी भारतीय संघाला अवघ्या २७८ धावा करता आल्या होत्या. हा सामना भारतीय संघाने १ डाव आणि ७७ धावांनी गमावला.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी वेळापत्रात बदल; ‘इथे’ आणि ‘या’ दिवसापासून होणार सामने
दुखापतीमुळे जडेजाचे चौथ्या कसोटीत खेळणे अनिश्चित, बड्या क्रिकेटरने सुचवली ‘ही’ २ नावे
‘या’ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाचा राजीनामा, येत्या टी२० विश्वचषकासाठी टीम ठरू शकली नाही पात्र





