पीव्ही सिंधूचे सलग तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न भंगले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील महिला एकेरीच्या राऊंड ऑफ 16 मध्ये सिंधूचा प्रवास संपुष्टात आल्याने भारताला बॅडमिंटनमध्ये पदकाच्या शोधात आणखी एक धक्का बसला आहे. सिंधूला चिनी बॅडमिंटनपटू हे बिंग जियाओकडून 21-19, 21-14 अशा सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला. सिंधूला ऑलिम्पिक पदक जिंकण्यात अपयश येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सिंधूने डावाची सुरुवात चीनच्या जियाओवर वर्चस्व प्रस्थापित करत केली. तिने पहिला गुण मिळवला, त्यानंतर जियाओने कमबॅक करत आघाडी घेतली. अखेर सिंधूने जियाओला रोखत 12-12 अशी बरोबरी साधली. जियाओने पुन्हा एकदा आघाडी घेतली, पण भारतीय बॅडमिंटनपटूने देखील आपली ताकद वाढवत 19-19 अशी बरोबरी साधली. पण शेवटी जियाओने पहिला सेट 21-19 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये जियाओच्या शानदार खेळाच्या शैलीमुळे सिंधूला पुनरागमनाची एकही संधी मिळू शकली नाही. खेळ हळूहळू सिंधूच्या हातातून निसटला. जियाओने प्रभावी कामगिरी करत दुसरा सेट 21-14 असा जिंकला.
पीव्ही सिंधूचा पराभव हा भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेतील मोठा धक्का ठरला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ज्या 7 खेळाडूंनी भारताला पदक जिंकून दिले होते. त्यापैकी एक सिंधू होती. तिच्याकडून यंदाच्या ऑलिम्पिकमधून पदकाची अपेक्षा होती. मात्र राउंड ऑफ 16 मध्ये सिंधूचा पराभव झाला.
तत्तपूर्वी, 50 मीटर एअर रायफल थ्री पोझिशनमध्ये मराठमोळ्या स्वप्निल कुसळेने कांस्य पदकावर निशाणा साधला. नंतर बॅटमिंटनमध्ये झालेल्या पुरुषांच्या एकेरीत लक्ष्य सेनने भारताच्या एचएस प्रणॉयचा पराभव करत अंतिम 16 मध्ये प्रवेश केला. लक्ष्यची पुढची लढत आता चायनीज तैपेईच्या चू टिन चेनशी होणार आहे. तर दुहेरीमध्ये भारताच्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला.
हेही वाचा-
भारत-श्रीलंका एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकाॅर्ड
आयपीएल 2025च्या मेगा लिलावात सीएसके धोनीला रिटेन करणार?
जगातला कोणताच फलंदाज मोडू शकणार नाही, सचिन तेंडुलकरचे हे 5 वर्ल्ड रेकाॅर्ड