यावर्षी संयुक्त अरब अमिराती आणि ओमान या देशांमध्ये टी२० विश्वचषकाचे सामने आयोजित करण्यात येणार आहे. मुख्य टी२० विश्वचषक स्पर्धेच्या पूर्वी पात्रता फेरीही पार पडणार आहे. या पात्रता फेरीत ओमान संघही सामील होणार आहे. त्यामुळे ओमानने या स्पर्धेच्या तयारीसाठी अनोखी शक्कल लढवली आहे.
या स्पर्धेच्या तयारीसाठी ओमान संघाला सराव सामने खेळायचे आहे. ओमानच्या क्रिकेट बोर्डाने ओमानमध्ये पाच किंवा सहा टी-२० सामने खेळण्यासाठी मुंबईच्या संघाला आमंत्रित केले आहे.
ओमान संघ टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या फेरीत (पात्रता फेरी) सहभागी होणार आहे. ओमानच्या राष्ट्रीय संघाला सरावाची आवश्यकता असल्याने संघाला सराव देण्यासाठी ही व्यवस्था केली जात आहे. ओमान क्रिकेटचे (ओसी) प्रमुख पंकज खिमजी यांनी मुंबईच्या संघाला आपल्या देशात आमंत्रित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
ओसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) दुलीप मेंडिस यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) सचिव संजय नाईक यांना हे निमंत्रण पाठवले होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) निमंत्रण स्वीकारले आहे. याला श्रीलंकेचे माजी कर्णधार मेंडिस यांनीही दुजोरा दिला आहे.
ओमान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दुलीप मेंडिस म्हणाले, मुंबईचा संघ 19 ऑगस्टला मस्कतला रवाना होईल. हा संघ मुंबईचा क्रिकेट असोसिएशनचा असेल, जो बीसीसीआयच्या देशांतर्गत हंगामात मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने खेळतो.
या सामन्यामुळे दोन्ही संघांना फायदा होणार आहे. टी -20 विश्वचषकापूर्वी ओमानला काही दर्जेदार सराव मिळतील आणि मुंबई संघाला भारतीय घरगुती हंगाम सुरू होण्यापूर्वी राष्ट्रीय संघासोबत खेळण्याची संधी मिळेल. ओमानने टी-20 विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे आणि ओमान पहिल्या फेरीच्या सहा सामन्यांचेही आयोजन करणार आहे.
खरंतर हा टी२० विश्वचषक भारतात होणार होता. पण भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता, आयसीसी ही स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये आयोजित करत आहे, ज्याचे आयोजन बीसीसीआय करणार आहे.
या दौऱ्याची पुष्टी करणाऱ्या एमसीएच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, निवड समितीचे प्रशिक्षक अमोल मजुमदार यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर मुंबईचा संघ निवडला जाईल. भारताचे माजी खेळाडू आणि मुंबई संघाचे मुख्य निवड समिती सदस्य गुलाम पारकर यांनी अलीकडेच मुंबईत परतण्यापूर्वी ओमानमध्ये बराच काळ काम केले होते. या सामन्यांमध्ये मुंबईकडून खेळणारे पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादवसारखे खेळाडू खेळणार नाही. शॉ आणि सुर्यकुमार इंग्लंडमध्ये असल्याने खेळणार नाहीत आणि श्रेयस अय्यर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) साठी यूएईला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतातील असे ३ क्रिकेट स्टेडियम; जिथे १० वर्षांपासून झाला नाही एकही सामना
“मला पाकिस्तानला जागतिक कसोटी अजिंक्यपदचे विजेतेपद मिळवून देण्याची इच्छा”
तब्बल ८९ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपणार! भारतीय संघाकडे ‘हा’ विक्रम करण्याची संधी