क्रिकेटमध्ये आजपर्यंत अनेक रोमांचक सामने पार पडले आहेत, अगदी 2019 विश्वषकातील अंतिम सामन्याही श्वास रोखून धरणारा ठरला होता. याच रोमांचक सामन्यांबद्दल चर्चा सुरु झाली की हमखास आठवतो तो सामना म्हणजे 1999 विश्वचषकातील ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात उपांत्य फेरीचा सामना. या सामन्याला आज (17 जून) 23 वर्षे पूर्ण होत आहे. या सामन्याच्या अखेरच्या क्षणी आलेल्या नाट्यपूर्ण वळणामुळे तो सर्वांच्याच लक्षात राहिला.
आत्तापर्यंत विश्वचषकातील सर्वाधिक रोमांचकारी ठरलेल्या सामन्यांपैकी तो एक सामना होता. तो सामना विकेट, धावा अशा सगळ्याच दृष्टीने बरोबरीचा ठरला.
मात्र अखेरच्या क्षणी दक्षिण आफ्रिकेचा ऍलन डोनाल्ड धावबाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेकडे आंतिम सामन्यात प्रवेश करण्याची चालुन आलेली संधी अखेरच्या क्षणी गमवावी लागली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात स्थान मिळवले आणि अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत त्या विश्वचषकाचे विजेतेपदही मिळवले.
त्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला 49.2 षटकात 213 धावांवर सर्वबाद केले होते. त्यानंतर 214 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अखेरच्या षटकात द. आफ्रिकेला 9 धावांची गरज होती. त्यावेळी अखेरच्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर फॉर्ममध्ये असलेल्या लान्स क्लुसनर दोन चौकार ठोकत सामना दक्षिण आफ्रिकेकडे झुकवला होता.
त्यावेळी दक्षिण आफ्रिका 49.2 षटकात 9 बाद 213 धावा अशा बरोबरीच्या स्थितीत होता. खेळपट्टीवर त्या विश्वचषकात मालिकावीर ठरलेला क्लुसनर आणि डोनाल्ड होते. क्लुसनर 31 धावांवर नाबाद खेळत होता.
दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी फक्त एका धावेची गरज होती. असे असताना या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर नॉन स्ट्रायकर एन्डला असलेला डोनाल्ड धावबाद होता होता वाचला. परंतू पुढच्याच चेंडूवर पुन्हा एकदा धावबादचे नाट्य रंगले.
डॅमियन फ्लेमिंगने टाकलेल्या यॉर्करवर क्लुसनरने सरळ फटका खेळला आणि धाव घेण्यासाठी तो धावला मात्र डोनाल्डचे त्याकडे लक्ष गेले नाही. अखेर डोनाल्डच्या हातुन बॅट निसटल्याने तो क्लुसनरला पाहुन धाव पूर्ण करण्यासाठी पळाला. पण तोपर्यंत चेंडू यष्टीरक्षक ऍडम गिलख्रस्टच्या हातात आला होता. त्याने डोनाल्डला धावबाद करत दक्षिण आफ्रिकेचे पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत जाण्याचे स्वप्न संपुष्टात आणले.
त्यावेळी हा सामना बरोबरीत सुटला असला तरी सुपर सिक्सच्या फेरीतील गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेपेक्षा वरच्या स्थानावर होती. त्यामुळे स्टिव्ह वॉच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्यात प्रवेश मिळाला तर दक्षिण आफ्रिकेचे त्या विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले.
The greatest ever ODI finish?#OnThisDay in 1999, the @cricketworldcup semi-final between Australia finished in a tie, Allan Donald ran out with scores level! 🇦🇺🇿🇦 pic.twitter.com/qrIZvp0v5d
— ICC (@ICC) June 17, 2018
दक्षिण आफ्रिकेसाठी आणि संपूर्ण स्पर्धेत चांगला खेळ करणाऱ्या क्लुसनरसाठी हा क्षण खुप कठीण होता.
त्याबद्दल बोलताना क्लुसनरने सांगितले होते, “मी माझ्यावरच नाराज होतो. मला थोडा संयम ठेवायला पाहिजे होता. पण, मला वाटते हे एक चांगले विज्ञान आहे. आपण नेहमीच ‘आम्ही जर वाट पाहिली असती तर’ किंवा जे काही म्हणू, पण ते शेवटचे दोन चेंडू उत्तम यॉर्कर्स होते आणि आम्ही म्हणत बसलो की ‘आम्ही आधीच संधीचा फायदा घ्यायला हवा होता'”
तसेच ऑस्ट्रेलियाकडून शेवटचे षटक टाकणारा आणि डोनाल्डला धावबाद करणारा डॅमियन फ्लेमिंग म्हणाला होता, “चौथ्या चेंडूवर मी अखेर योग्य यॉर्कर टाकला. माझ्या चांगले लक्षात आहे, क्लुसनर धाव घेण्यासाठी धावत होता आणि डोनाल्डला कुठे पळावे याची खात्री नव्हती.”
तो पुढे म्हणाला त्याक्षणीच्या आनंदासाठीच तुम्ही क्रिकेट खेळता.
महत्त्वाच्या बातम्या –
‘त्याचा सामना करणे कधीच सोपे नव्हते…’, ऑस्ट्रेलियन स्पिनर वाढवतो भारतीय दिग्गजाच्या अडचणी
‘मला धोनीची जागा घ्यायची आहे!’, रियान परागच्या विधानाने पुन्हा एकदा खळबळ
‘मी उमरान इतक्या वेगाने गोलंदाजी करू शकत नाही, पण…’ भारतीय गोलंदाजाने उलघडले मनातलं गुपित