जेव्हा कधी ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा निश्चित इतिहास लिहिला जाईल, तेव्हा एक व्यक्ती इतर सर्वांपेक्षा सर्वात वरच्या स्थानी असेल, त्या खेळाडूची खेळाप्रती असलेली निष्ठा आणि त्याचा खेळाडूंवर पडलेला प्रभाव या गोष्टींमुळे तो खेळाडू सर्वांपेक्षा वरचढ ठरेल.
अनेकांना वाटेल ती व्यक्ती सर डॉन ब्रॅडमन आहे, पण असे नाही. या खेळाडूने, आपल्या शांत स्वभाव, मुत्सद्देगिरी आणि खेळभावनेने फलंदाजीसोबतच भावी पिढ्यांना प्रभावित केले, जे ब्रॅडमन कधीही करू शकले नाहीत. ते खेळाडू म्हणजे माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार बिल वूडफुल.
वूडफुल यांच्याविषयी बर्याच कथा आहेत ज्या त्यांना ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील सर्वाधिक प्रशंसनीय ऑस्ट्रेलियन कर्णधार म्हणून सिद्ध करतात. १९३२-१९३३ च्या ‘कुप्रसिद्ध’ बॉडीलाईन मालिकेत ते ऑस्ट्रेलियाचे कर्णधार होते. इंग्लंडचे कर्णधार डग्लस जार्डीन यांनी पहिल्या सामन्यावेळी आरोप केला की, एका ऑस्ट्रेलियन खेळाडूने त्यांना “बास्टर्ड” म्हटले. त्यावेळी, वूडफुल यांनी सर्व खेळाडूंना रांगेत उभे केले आणि जार्डीन यांना विचारले, “यांच्यापैकी कोणत्या बास्टर्डने तुम्हाला बास्टर्ड म्हटले होते ?” या घटनेमुळे त्या संपूर्ण मालिकेतील तणावाची पहीली ठिणगी पडली.
त्यांनी क्रिकेटपटू म्हणून नाव कमावले असले तरी वूडफुल नेहमीच स्वत: ला एक शिक्षक मानत असत. १९१९ मध्ये त्यांनी शालेय शिक्षक म्हणून पात्रता मिळविली आणि नंतर मेलबर्न हायस्कूलमध्ये गणिताचे शिक्षक म्हणून काम केले. नंतरच्या काळात ते सहा वर्षे मुख्याध्यापक होते. कीथ मिलर, डग रिंग, जॅक विल्सन आणि ऑलिम्पिक धावपटू रॉन क्लार्क यांच्यासारखे नामांकित खेळाडू वूडफुल यांचे विद्यार्थी होत.
१९३० च्या ऍशेस मालिकेत ४-१ असा पराभव पत्करल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे कर्णधार जॅक रायडर यांना १९३२ च्या ऍशेस दौर्यासाठी संघातून वगळण्यात आले होते. वूडफुल यांच्यामते, रायडर हे कर्णधारपदाचे योग्य उमेदवार होते. पण, त्यानंतर खेळाडूंदरम्यान मतदान झाल्यानंतर वूडफुल यांना कर्णधार घोषित करण्यात आले. वूडफुल एका युवा संघाचे नेतृत्व करणार होते. संघातील ११ खेळाडू प्रथमच ऍशेस खेळत होते.ऍशेससाठीचा सर्वात कमकुवत ऑस्ट्रेलिया संघ अशी त्या संघाची वल्गना केली गेली होती. याच संघाने नंतर २-१ असा मालिका विजय साजरा केला.
ऑस्ट्रेलियाचे भाग्य होते की, त्या कुप्रसिद्ध बॉडीलाइन मालिकेच्या दरम्यान, वूडफुल यांच्यासारखे खेळाडू कर्णधार होते. त्यांनी ‘ जेंटलमन्स गेम ‘ हे क्रिकेटचे नाव सार्थ केले आणि इंग्लंडच्या गोलंदाजांप्रमाणे, विरोधी संघाच्या फलंदाजांच्या अंगावर गोलंदाजी न करण्याचा आदेश आपल्या गोलंदाजांना दिला. ऍडलेड येथे तिसर्या कसोटी सामन्यात इंग्लंडचे गोलंदाज हॅरोल्ड लारवुड यांनी वूडफुल यांच्या छातीवर चेंडूचा जोरदार प्रहार केल्याने मालिकेचा तणाव टोकाला गेला. या मालिकेमुळे दोन्ही देशांमधील संबंधांना धोका निर्माण झाला होता. या घटनेनंतर, इंग्लंडचे व्यवस्थापक पेल्हाम वॉर्नर हे वूडफुल यांना भेटायला आले असता,” मला तुमच्या सदिच्छांची गरज नाही. याठिकाणी फक्त एक संघ क्रिकेट खेळतोय.” असे ठणकावून सांगत ड्रेसिंग रूम बाहेर काढले होते.
भक्कम बचावात्मक फलंदाजीच्या तंत्रामुळे व विश्वासार्हतेसाठी वूडफुल यांना ” रॉक ऑफ जिब्राल्टर, वर्मकिल्लर आणि ओल्ड स्टेडफास्ट ” अशी अनेक टोपणनावे दिली गेली होती.
बॉडीलाइन मालिकेदरम्यानच, वूडफुल यांना क्रिकेटमधील त्यांच्या सेवेबद्दल आणि त्यांच्या कृतीबद्दल ‘नाईटहूड’ किताब स्विकारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. परंतु, त्यांनी क्रिकेटपेक्षा शिक्षक म्हणून काम करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले आणि हा सन्मान नाकारला. नंतर त्यांनी कबूल केले की, ” मला शिक्षक म्हणून हा पुरस्कार मिळाला असता, तर मी ते स्वीकारला असता, पण कोणत्याही परिस्थितीत मी क्रिकेट खेळण्यासाठी हा स्वीकारणार नाही. ” १९६३ मध्ये शिक्षण सेवेसाठी त्यांना “ऑर्डर ऑफ़ ब्रिटीश एम्पायर ” पुरस्कार देण्यात आला. १९२७ मध्ये वूडफुल हे ‘ विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर ‘ पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंपैकी एक होते. २००१ मध्ये त्यांना ऑस्ट्रेलियन हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले.