‘क्रिकेट’ हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळांपैकी एक म्हणून गणला जातो. याचं कारणही तितकंच खास आहे. मैदानी खेळ असूनही मैदानावर उपस्थित असलेल्या आणि नसलेल्या प्रत्येक व्यक्तीला क्रिकेट ‘आवड’ म्हणून जपता येतं. म्हणूनच, क्रिकेट येत असो अथवा नसो, ते पाहण्याचा आनंद घेत क्रिकेटवर प्रेम करणाऱ्यांची संख्या जगात सध्या तरी अगणीत अशीच आहे.
कुतुहूल, थरार, आनंद, दुःख, राग, आदर अशा अनेक भावनांना सोबत घेऊन क्रिकेट पुढे जात राहिलंय. तसेच, क्रिकेटमध्ये घडलेल्या अनेक घटनांना आठवणींच्या कुपीत बंदिस्त करुन ठेवणे सर्वांनाच आवडतं. क्रिकेटच्या मैदानावर सातत्याने काहीना काही विक्रम, पराक्रम, लहान-मोठ्या घडामोडी घडतच असतात. याच घडामोडी पुढे जाऊन आठवणी बनून राहतात.
क्रिकेटमधील अशाच काही आठवणींना आपण दररोज ‘इतिहासात डोकावून’ प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहोत. दिनविशेषाच्या भाषेत सांगायचं झाल्यास आजच्याच दिवशी क्रिकेट इतिहासात घडलेले पराक्रम आपण प्रेक्षकांना सांगणार आहोत.
आज आपण ज्या पराक्रमाची आठवण ‘महा स्पोर्ट्स’च्या सर्व प्रेक्षकांना करुन देत आहोत, तो विक्रम वाचताना प्रत्येक भारतीयाला नक्कीच अभिमान वाटेल. आणि या पराक्रमाचा शिलेदारही आहे, लाखो क्रिकेटरसिकांचा लाडका भज्जी म्हणजेच हरभजन सिंग हाच.
याच हरभजनने एकदा आपल्या फिरकीवर कांगारुंना अक्षरशः नाचवलं होतं. तो सामना, तो क्षण आजही प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या स्मृतीपटलावर जसच्या तसा ताजा आहे. चला तर पाहूयात हरभजन सिंहचा तो ‘भीमपराक्रम’.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामना, २००१
कोलकाता येथे भारत आणि ऑस्ट्रेलिा यांच्यात २००१ साली कसोटी सामना सुरु होता. हा सामना तसा अनेकार्थाने ऐतिहासिक आहे. मात्र, आजच्याच दिवशी म्हणजेच दिनांक ११ मार्च रोजी त्या सामन्यात हरभजन सिंगने पराक्रम केला होता, तो पराक्रम म्हणजे भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा पहिलाच खेळाडू म्हणून भज्जीने त्याचे नाव इतिहासात नोंदवले होते.
Special day in my life 11/3/2001 Hattrick day 🙏 https://t.co/YS6JqcLE4c
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) March 11, 2020
असा रंगला होता सामना…
सन २००१ सालची ती कसोटी व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांच्या फॉलोऑन नंतरच्या भागीदारीसाठी प्रसिद्ध आहे. पण त्याच कसोटीच्या पहिल्या डावात हरभजनने हॅट्रिक घेतली होती. त्याने या सामन्यात पहिल्या डावातील ७२ व्या षटकात दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर अनुक्रमे रिकी पॉन्टिंग, ऍडम गिलख्रिस्ट आणि शेन वॉर्न यांना सलग बाद केलं होतं. त्याने पान्टिंग आणि गिलख्रिस्टला पायचीत केले होते. तर शेन वॉर्नला झेलबाद केले होते. वॉर्नचा झेल सदागोपन रमेशने घेतला होता.
त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या. तर भारताला पहिल्या डावात १७१ धावांवर रोखत फॉलोऑन दिला होता. त्यावेळी लक्ष्मणच्या २८१ आणि द्रविडच्या १८० धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने दुसरा डाव ६५७ धावांवर घोषित करत ऑस्ट्रेलियाला ३८४ धावांचे आव्हान दिले होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघ २१२ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यामुळे भारताने १७१ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात हरभजनने एकूण १३ विकेट्स घेतल्या होत्या आणि भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा सगळ्या टीम इंडियाला सोडलं, पण हरभजन सिंगला मात्र न्यूझीलंडच्या विमानतळावर पकडलं