श्रीलंका संघाविरुद्ध दुसरा टी-२० सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. संघातील अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या ८ खेळाडूंना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. त्यामुळे या दौऱ्यावर नेट गोलंदाज म्हणून निवड झालेल्या खेळाडूंना अंतिम १५ मध्ये संधी देण्यात आली. परंतु आज (२९ जुलै) होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यात या नेट गोलंदाजांपैकी एका गोलंदाजाचे नशीब उजळण्याची दाट शक्यता आहे.
या दौऱ्यासाठी चार नेट गोलंदाजांची निवड करण्यात आली होती. या गोलंदाजांचे भारतीय फलंदाजांना सरावावेळी गोलंदाजी करणे एवढेच काम होते. परंतु कोणास ठाऊक अशी परिस्थिती येईल आणि या खेळाडूंना अंतिम १५ मध्ये स्थान मिळेल. गेल्या २ दिवसात भारतीय संघात अनेक उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. त्यातही आज होणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी मुख्य गोलंदाज नवदीप सैनी दुखापतग्रस्त असल्याचे म्हटले जात आहे. तो जर पूर्णपणे फिट नसेल तर या नेट गोलंदाजांपैकी एका गोलंदाजाला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. चला तर जाणून घेऊया या गोलंदाजांबद्दल.(One net bowler might replace injured Navdeep Saini in india vs srilanka third T20I)
इशान पोरेल : २२ वर्षीय इशान पोरेल हा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. तो देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत बंगाल संघाचे प्रतिनिधित्व करतो. तो आयपीएल स्पर्धेत किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याने आतापर्यंत एकूण १९ देशांतर्गत टी२० सामने खेळले आहेत. यात त्याला २९ गडी बाद करण्यात यश आले आहे.
अर्शदीप सिंग : उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग देखील श्रीलंकेच्या फलंदाजांना अडचणीत टाकू शकतो. कारण आयपीएल स्पर्धेत त्याने सुरुवातीच्या आणि अंतिम षटकांमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. इशान पोरेलसह अर्शदीप सिंग देखील आयपीएल स्पर्धेत किंग्स इलेव्हेन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याने आतापर्यंत एकूण २४ देशांतर्गत टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याला २९ गडी बाद करण्यात यश आले आहे.
सिमरनजीत सिंग : देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत दिल्लीचे प्रतिनिधित्व करणारा सिमरनजीत सिंग डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये ३ वर्षांचा अनुभव असलेल्या सिमरनजीत सिंगने आतापर्यंत एकूण १५ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याला १८ गडी बाद करण्यात यश आले आहे.
साई किशोर : देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये तामिळनाडू संघाचे प्रतिनिधित्व करणारा २४ वर्षीय साई किशोर हा डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण १७ सामने खेळले आहेत. यात त्याला ४८ गडी बाद करण्यात यश आले आहे. त्याला संघात संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण संघात डाव्या हाताचा फिरकीपटू कुलदीप यादव उपलब्ध आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मास्टरमाईंड! अन् द्रविडने ड्रेसिंग रूममधून बाहेर येत पाठवला खास संदेश, पण काय होतं त्या चिठ्ठीत?
आम्ही अपयशी ठरलो, पण मला माझ्या शिलेदारांचा अभिमान आहे, त्यांना माझा सलाम- कर्णधार धवन
‘खेळाडूंना बाकावर बसवण्यासाठी किंवा सुट्ट्यांसाठी निवडलं जात नाही’, प्रशिक्षक द्रविडचे वक्तव्य