मंगळवारी रात्री (१० नोव्हेंबर) उशिरा आयपीएल २०२० ला आपला विजेता मिळाला. दुबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पाच गड्यांनी पराभव करत आयपीएल २०२० चे विजेतेपद मिळवले. या विजेतेपदासह मुंबई इंडियन्सने विक्रमी पाचव्यांदा आयपीएलची ट्रॉफी उंचावली. मुंबई इंडियन्सच्या या विक्रमी कामगिरी दरम्यान मुंबईच्या खेळाडूंनी अनेक विक्रमांना गवसणी घातली.
इशान किशन, क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव या मुंबईच्या फलंदाजांनी एबी डिव्हिलियर्स, विराट कोहली आणि ख्रिस गेल यांनी २०१५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती केली.
संपूर्ण हंगामात क्विंटन डी कॉक, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी मुंबईच्या फलंदाजीची धुरा वाहिली. या तीनही फलंदाजांनी आपल्या कामगिरीत कमालीचे सातत्य राखले. युवा इशान किशनने १४ सामन्यात ५७.३३ च्या लाजवाब सरासरीने ५१६ धावा कुटल्या. इशानपाठोपाठ यष्टीरक्षक सलामीवीर क्विंटन डी कॉक यानेदेखील ५०० धावांचा टप्पा पार केला. जवळपास प्रत्येक सामन्यावेळी मुंबईला आक्रमक सुरुवात करून देताना डी कॉकने १६ सामन्यात ५०३ धावांची मदत मुंबई इंडियन्सला केली.
संपूर्ण हंगामात चर्चेत राहिलेल्या ‘मुंबईकर’ सूर्यकुमार यादवने १६ सामन्यात मुंबईच्या मध्यफळीची जबाबदारी सांभाळत ४८० धावा फटकावल्या. आयपीएलच्या तेरा वर्षाच्या इतिहासात, कोणत्याही संघाच्या तीन फलंदाजांनी एका हंगामात ४७५ पेक्षा जास्त धावा काढण्याची ही केवळ दुसरी वेळ होती. यापूर्वी अशी कामगिरी २०१५ आयपीएल दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांनी केली होती.
आयपीएलच्या आठव्या हंगामात म्हणजेच आयपीएल २०१५ दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खेळताना; कर्णधार विराट कोहली याने ५०५, मधल्या फळीतील फलंदाज एबी डिव्हिलियर्सने ५१३ आणि सलामीवीर ख्रिस गेल याने ४९१ धावा काढून आपल्या संघाला प्ले-ऑफपर्यंत मजल मारून दिली होती. त्यानंतर, तेराव्या हंगामात मुंबईचे हे फलंदाज तशाच प्रकारची कामगिरी करण्यात यशस्वी ठरले.
महत्त्वाच्या बातम्या –
षटकारांचा बादशाह ! आयपीएलच्या १३व्या हंगामात ‘या’ पठ्ठ्याने ठोकलेत सर्वाधिक षटकार, पाहा आकडा
अररररर खतरनाक ! आयपीएल २०२० मधील सर्वोत्तम ५ झेल, पाहा व्हिडिओ
जब जब हम खेलेंगे तब तब जितेंगे! रोहित शर्मासाठी आयपीएलची फायनल नेहमीच ठरलीय लकी