वाढदिवस हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील एक महत्त्वाचा दिवस असतो. काहीतरी खास गोष्ट आपल्याकडून वाढदिवसाच्या दिवशी व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते.
अशीच गोष्ट जर क्रिकेटपटूच्या आयुष्यात झाली तर… वाढदिवसाच्या दिवशी शतकी खेळी किंवा विकेटची हॅट्रिक घेण्याची संधी मिळाली तर… जागतिक क्रिकेटमध्ये ४ खेळाडू असे आहेत ज्यांनी वाढदिवसाच्या दिवशी शतकी खेळी केली आहे. तर पीटर सिडल या गोलंदाजाने कसोटीत २६व्या वाढदिवसाला हॅट्रिक घेतली आहे. वाढदिवसाच्या दिवशी वनडेत मात्र कोणत्याही गोलंदाजाला हॅट्रिक घेता आलेली नाही.
राॅस टेलर या न्यूझीलंडच्या माजी कर्णधारानेही हा कारनामा केला आहे. त्याने ८ मार्च २०११ मध्ये विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध १२४ चेंडूत नाबाद १३१ धावा केल्या होत्या. अशी कामगिरी करणारा तो वनडे क्रिकेटमधला तिसराच खेळाडू ठरला होता. तेव्हा त्याचे वय केवळ २७ वर्षे होते.
हा विश्वचषक भारत- श्रीलंका आणि बांगलादेशने मिळून आयोजीत केला होता. यातील कॅंडी येथे झालेल्या सामन्यात टेलरने अतिशय स्फोटक खेळी केली होती. २९ षटकांत ४ बाद ११३ अशा अवस्थेतून त्याने संघाला बाहेर काढत ५० षटकांत ७ बाद ३०२ धावांचा टप्पा गाठून दिला होता. त्याने या सामन्यात पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरची अशी काही धुलाई केली होती की त्याचा हा कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला होता. अख्तरच्या ९ षटकांत तब्बल ७७ धावा न्यूझीलंड संघाने केल्या होत्या. या सामन्यात टेलर नाबाद राहिला होता.
या खेळाडूंनी वनडेत केल्या आहेत वाढदिवसाच्या दिवशी शतकी खेळी-
वाढदिवसाच्या दिवशी वनडेत पहिल्यांदा शतकी खेळी करण्याचा विक्रम विनोद कांबळी याच्या नावावर आहे. त्याने १८ जानेवारी १९९३ रोजी वयाच्या २१ वर्षी शतक केले होते. त्याने ही शतकी खेळी इंग्लड संघाविरुद्ध केली होती.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने वयाच्या २५व्या वाढदिवसाच्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध शारजात १३४ धावांची खेळी केली होती. सनथ जयसुर्याने ३९व्या वाढदिवसाच्या दिवशी बांगलादेश संघाविरुद्ध १३० धावांची खेळी कराची शहरात केली होती.
मनोरंजक लेख-
–वाढदिवसाच्या दिवशीच हॅट्रिक घेणारा जगातील एकमेव गोलंदाज
–बापरे! एमएस धोनीला कूल कॅप्टन्सीसाठी मिळाला होता सामनावीर पुरस्कार
–आणि फिल्डरला अद्भुत कामगिरीसाठी मिळाला होता मॅन ऑफ द मॅच
–एक नाही दोन नाही तर सगळ्या संघालाच जेव्हा दिली होती मॅन ऑफ द मॅच
–एकही विकेट, धाव किंवा झेल न घेणाऱ्या खेळाडूला जेव्हा मिळतो मॅन ऑफ द मॅच