बुधवारी (14 एप्रिल) रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने सनरायझर्स हैदराबादचा सहा धावांनी पराभव केला. आयपीएलच्या या हंगामातील आरसीबीचा हा सलग दुसरा विजय आहे. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 148 धावा करत हैदरबादला 150 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद संघ केवळ 20 षटकांत 9 बाद 143 धावाच करु शकला. त्यामुळे आरसीबीनी एक अनोखा विक्रम केला आहे.
आरसीबीने जवळजवळ 12 वर्षानंतर 150 धावांपेक्षा कमी धावांचा बचाव करताना सामना जिंकला आहे. तसेच 150 किंवा त्यापेक्षा कमी धावांचा बचाव करुन सामना जिंकण्याची ही आरसीबीची चौथीच वेळ आहे.
यापूर्वी शेवटचे 2009 आयपीएलमध्ये त्यांनी 150 पेक्षा कमी धावांचा 2 वेळा यशस्वी बचाव केला होता. आयपीएलच्या या दुसऱ्याच हंगामात त्यांनी राजस्थान रॉयल्सविरुद्ध 133 धावांचा आणि पंजाब किंग्स (आधीचे नाव किंग्स इलेव्हन पंजाब) विरुद्ध 145 धावांचा बचाव केला होता. त्याचबरोबर त्याआधी आरसीबीने 2008 आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 126 धावांचा यशस्वी बचाव केला होता.
केवळ दुसऱ्यांदा पहिले 2 सामने सलग जिंकण्यात यश
आरसीबीचा आयपीएल 2021 हंगामातील हा सलग दुसरा विजय आहे. विशेष म्हणजे आयपीएल हंगामातील पहिले 2 सामने जिंकण्यात आरसीबीला दुसऱ्यांदाच यश आले आहे. यापूर्वी त्यांनी 2014 आयपीएल हंगामात पहिले 2 सामने सलग जिंकले होते.
आरसीबीचा रोमांचक विजय
या सामन्यात आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत आठ गडी गमावून 149 धावा केल्या होत्या. तर प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ निर्धारित 20 षटकांत केवळ 143 धावा करू शकल्याने आरसीबीने सहा धावांनी विजय मिळवला. या आरसीबीच्या विजयात संघातील अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि फिरकी गोलंदाज शाहबाज अहमद यांनी मोठा वाटा उचलला.
या सामन्यात 26 वर्षीय शाहबाजने 2 षटकांत 7 धावा देऊन 3 बळी घेतले. त्याने त्याच्या एकाच षटकात हे तिन्ही बळी घेतले. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली रणनिती आखून या डावखुऱ्या फिरकीपटूला डावातील 17 वा षटक टाकण्यास दिले त्यानेही आपल्या कर्णधारास निराश नाही केले. त्याने या षटकांत जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे आणि अब्दुल समद यांना बाद करून सामन्याला वेगळे वळण दिले.
त्याअगोदर यंदाच्या आयपीएल लिलावात 14 कोटी रकमेत आरसीबीने विकत घेतलेल्या ग्लेन मॅक्सवेलने पाच वर्षांच्या दीर्घ काळानंतर आयपीएल सामन्यांत अर्धशतक ठोकले. हैदराबादविरुद्ध 41 चेंडूंत त्याने तीन षटकार आणि पाच चौकारांसह 59 धावांची निर्णायक खेळी केली.
यासामन्यात हैदराबादचा संघ लक्ष्याचा पाठलाग करत असताना रशीद खानने या सामन्याच्या शेवटच्या षटकात आपल्या संघास विजयाच्या अगदी जवळ नेले होते. या शेवटच्या षटकात हैदराबादला 3 चेंडूत 8 धावांची आवश्यकता होती. परंतु दुसरी धाव घेण्याचा नादात तो धावबाद झाल्याने हैदराबादच्या या सामन्यातील विजयाच्या आशा संपुष्टात आल्या.
तसेच यासामन्यात आरसीबीकडून हर्षल पटेलने पुन्हा एकदा चमकदार गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांत 25 धावा देऊन 2 बळी घेतले. तसेच मोहम्मद सिराज देखील या सामन्यात अत्यंत फायदेशीर ठरला. त्यानेही 4 षटकांत 25 धावा देऊन 2 बळी घेतले.
महत्त्वाच्या बातम्या –
सानिया मिर्झाच्या वडिलांनी धरले सनरायझर्सला धारेवर, ट्विट करत म्हटले…
“म्हणून हार्दिक, सूर्यकुमार, ईशान हे मनिष पांडेच्या पुढे निघून गेले”, माजी क्रिकेटपटू बरसला
गायक बनला विनोद कांबळी! चाहत्यांसाठी गायले ‘हे’ भक्तीगीत, व्हिडिओ होतोय व्हायरल