आयपीएल २०२२ हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे, म्हणजेच आयपीएलचा आगामी हंगाम सुरू होण्यासाठी एक आठवड्यापेक्षाही कमी वेळ राहिला आहे. स्पर्धेत एकूण १० संघ उतरणार आहेत. मागच्या हंगामातचे विजेतेपद एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने मिळवले होत. सीएसकेला मिळालेल्या या विजयात त्यांच्या सलामीवीरांची भूमिका महत्वाची होती. कोणत्याही संघाला सामना जिंकण्यासाठी त्यांच्या सलामीवीरांनी चांगले प्रदर्शन करणे आवश्यक असते. आगामी आयपीएल हंगामात आपल्याला काही चांगल्या सलामीवीर जोड्या पाहायला मिळणार आहेत.
आयपीएलचा इतिहास पाहिला, तर संघाच्या विजयात सलामीवीरांची भूमिका महत्वाची राहिली आहे. एमएस धोनी (MS Dhoni) याचा संघ चेन्नई सुपर किंग्जही (CSK) मागच्या हंगामात सलामीवीरांच्या चांगल्या प्रदर्शनाच्या जोरावर ट्रॉफी जिंकू शकला. मागच्या हंगामात फाफ डू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड या सलामीवीर जोडीने सीएसकेसाठी तब्बल ६०० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.
परंतु, आगामी हंगामात फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) सीएसकेसोबत नसून आरसीबीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे (RCB) कर्णधारपद सोडल्यानंतर डू प्लेसिसने ही जबाबदारी स्वीकारली आहे. अशात सीएसकेसाठी ऋतुराजसोबत सलामीसाठी दुसरा चेहरा दिसणार हे नक्की. सलामीवीराच्या रूपात सीएसकेकडे रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू आणि डेवॉन कॉनवे असे पर्याय आहेत.
विराट आणि डू प्लेसिस करू शकतात आरसीबीच्या डावाची सुरुवात
विराट कोहली (Virat Kohli) आरसीबीसाठी अनेकदा सलामीसाठी उतरतो. मागच्या हंगामात देवदत्त पडिक्कलने त्यांची चांगली साथ दिली होती. पण आगामी हंगामात पडिक्कल राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे. अशात कर्णधार डू प्लेसिस आणि विराट आरसीबीच्या डावाची सुरुवात करू शकतात. या दोन्ही दिग्गजांचे आयपीएलमधील आकडे अप्रतिम आहेत. मुंबई इंडियन्सचा विचार केला, तर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ईशान किशन त्यांच्या डावाची सुरवात करतील, ही गोष्ट स्पष्ट आहे. या दोघांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारतासाठी सलामी केली आहे.
धवनला मिळणार मयंकची साथ
शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि पृथ्वी शॉ यांनी मिळून मागच्या हंगामातील अनेक सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सला चांगली सुरुवात दिली होती, पण आगामी हंगामात धवन पंजाब किंग्जसाठी खेळणार आहे. पंजाब किंग्ज (Punjab KIngs) संघाचा कर्णधार मयंक अगरवाल (Mayank Agarwal) आणि धवन सलामीसाठी येऊ शकतात.
दिल्ली कॅपिटल्सकडे धवनची कमी पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियन दिग्गज डेविड वॉर्नर (David Warner) आहे. नवीन फ्रेंचायझी लखनऊ सुपर जायंट्सचा विचार केला तर, त्यांचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि क्विंटन डी कॉक डावाची सुरुवात करताना दिसू शकतात. मागच्या हंगामात राहुल पंजाबचा कर्णधार होता आणि डी कॉक मुंबईचे प्रतिनिधित्व करत होता.
राजस्थान रॉयल्ससाठी जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल सलामीवीरच्या रूपात दिसू शकतात. त्यांच्याकडे यशस्वी जयस्वालच्या रूपात पर्याची खेळाडूही आहे. सनरायझर्स हैदराबादकडून कर्णधार केन विलियम्सन आणि राहुल त्रिपाठीची जोडी सलामीसाठी उतरताना दिसू शकते. एडेन मार्करमही संघात सहभागी आहे.
केकेआरकडून वेंकटेश अय्यर आणि सुनील नरेन सलामीवीराच्या रूपात मैदानात उतरण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यांच्याकडे एरॉन फिंच आणि नितीश राणा हे पर्यायी खेळाडू आहेत. गुजरात टायटन्सचा विचार केला, तर शुभमन गिल आणि अफगानिस्तानचा युवा फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज याला सलामी करण्याची संधी मिळू शकते. त्यांच्याकडे यष्टीरक्षक वृद्धिमान साहाच्या रूपात पर्याय उपलब्ध आहे.
महत्वाच्या बातम्या –
शुभमंगल सावधान! आयपीएल सुरू होण्यापूर्वी केकेआरचा दिग्गज अडकला लग्नबंधनात, फोटो व्हायरल
‘भारती विद्यापीठ आयएमईडी’च्या ‘स्पोर्ट्स मीट २०२२’ चे उद्घाटन
ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप: फायनलमधील पराभवानंतरही लक्ष्य सेनने जिंकली करोडो मने; मोदी, सचिनकडूनही कौतुक