इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता हा सामना सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिलीच लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना काही भारत पाकिस्तान सामन्यापेक्षा काही कमी नसतो. चौकार आणि षटकारांच्या पावसासह दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत असते.
या हाय व्होल्टेज सामन्यात दोन्ही संघ आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघ आपली सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरवतील. त्यापूर्वी जाणून घेऊया, दोन्ही संघातील सलामीवीर फलंदाज कोण असणार?
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्स संघ आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात मुंबई इंडियन्स संघाने ५ वेळेस जेतेपद पटकावले आहे. ही स्पर्धा जिंकून मुंबई इंडियन्स संघाला विजयाची हॅट्ट्रिक करण्याची सुवर्णसंधी असणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघ चांगली सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. अशात मुंबई इंडियन्स संघाकडून रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक हे दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानात येऊ शकतात.
भारतात खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसीस यांनी डावाची सुरुवात केली होती. परंतु नुकताच संपन्न झालेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत फाफ डू प्लेसीला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे तो मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळताना दिसून येण्याची शक्यता खूप कमी आहे.
अशात डू प्लेसीच्या अनुपस्थितीत कर्णधार एमएस धोनी सलामीला फलंदाजी करण्याची जबाबदारी रॉबिन उथप्पाला देऊ शकतो. रॉबिन उथप्पाने गेली काही वर्षे कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स संघासाठी सलामीवीर फलंदाजाची भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे या सामन्यात सलामीला येण्यासह रॉबिन उथप्पा चेन्नई सुपर किंग्स संघाकडून पदार्पण करतानाही दिसून येऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
‘ब्लॉकब्लास्टर सामन्या’पूर्वी जखमी डू प्लेसिसची सरावास सुरुवात, पण मुंबईविरुद्ध खेळणार की नाही?
मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी मुंबईविरुद्ध ‘या’ तगड्या प्लेइंग Xiसह उतरेल धोनी, पाहा संभाव्य संघ