सोमवारी (दि. 29 मे) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील अंतिम सामना गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. हा सामना चेन्नई सुपर किंग्स संघाने 5 विकेट्सने आपल्या नावावर करत ट्रॉफी जिंकली. आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची ही चेन्नईची पाचवी वेळ होती. विशेष म्हणजे, ट्रॉफी गमावली असली, तरीही गुजरात संघाचाच खेळाडू ऑरेंज कॅप पुरस्काराचा मानकरी बनला. गुजरातचा युवा फलंदाज शुबमन गिल याने आयपीएल 2023 स्पर्धेत सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप जिंकण्याचा मान मिळवला.
आयपीएल 2023 हंगामात सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज (Top 5 batsmen with highest runs in IPL 2023)
1. शुबमन गिल
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा मान शुबमन गिल (Shubman Gill) याने मिळवला. शुबमनने सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला दिली जाणारी कॅप) आपल्या नावावर केली. शुबमनने या हंगामात 17 सामने खेळताना 59.33च्या सरासरीने 890 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 157.80च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. या धावा करताना त्याने 3 शतके आणि 4 अर्धशतकेही झळकावली. यादरम्यान 129 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती.
2. फाफ डू प्लेसिस
आयपीएल 2023 स्पर्धेच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानी राहिलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. फाफने या सामन्यात 14 सामन्यात फलंदाजी करताना 56.15च्या सरासरीने आणि 153.68च्या स्ट्राईक रेटने 730 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने सर्वाधिक 8 अर्धशतके झळकावली. 84 ही त्याची हंगामातील सर्वोत्तम धावसंख्या होती.
3. डेवॉन कॉनवे
आयपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा सलामीवीर डेवॉन कॉनवे (Devon Conway) हादेखील या यादीत सामील आहे. कॉनवेने अंतिम सामन्यात 25 चेंडूत 47 धावा करून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी विराजमान झाला. कॉनवेनेही हंगामात 16 सामने खेळताना 51.69च्या सरासरीने आणि 139.70च्या स्ट्राईक रेटने 672 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 6 अर्धशतकेही झळकावली आहेत. नाबाद 92 ही त्याची हंगामातील सर्वोत्तम धावसंख्या आहे.
4. विराट कोहली
हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी आरसीबी संघाचाच विस्फोटक फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आहे. विराटने 14 सामन्यात फलंदाजी करताना 53.25च्या सरासरीने 639 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 2 शतके आणि 6 अर्धशतके झळकावली आहेत. यादरम्यान त्याने 139.82च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. नाबाद 101 ही त्याची हंगामातील सर्वोत्तम धावसंख्या आहे.
5. यशस्वी जयसवाल
आयपीएल 2023 स्पर्धेत अनेक युवा खेळाडू चमकले. त्यापैकीच एक म्हणजे, यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) होय. जयसवालने त्याच्या फलंदाजीने जगभरातील दिग्गज क्रिकेटपटूंचे लक्ष वेधले आणि वाहवादेखील मिळवली. जयसवालने या हंगामात 14 सामने खेळताना 48.08च्या सरासरीने आणि 163.61च्या स्ट्राईक रेटने 625 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत. 124 ही त्याची हंगामातील सर्वोत्तम धावसंख्या आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL प्ले-ऑफ्सचा राजा गुजरात टायटन्स! फायनलमध्ये चेन्नईला चोपत नावावर केला खास विक्रम
फायनलमध्ये साईने दिले ‘सुदर्शन’! चेन्नईची गोलंदाजी फोडत ठोकल्या वादळी 96 धावा