भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवार म्हणजेच उद्यापासून ओव्हल मैदानावर पाचवी आणि शेवटची कसोटी सुरू होणार आहे. पण या महत्त्वाच्या सामन्यापूर्वीच नाट्यमय वळण आलं आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि ओव्हलचे चीफ क्यूरेटर ली फोर्टिस यांच्यात मंगळवारी तीव्र वाद झाला.
वादाची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा फोर्टिस यांनी भारताच्या सपोर्ट स्टाफला पिचपासून 2.5 मीटर दूर उभं राहण्याचे निर्देश दिले. त्यावर गंभीर संतापले आणि मैदानकर्मचाऱ्यांकडे बोट दाखवत म्हणाले, “तुम्ही आम्हाला काय करायचं ते सांगणार नाही. तुम्ही फक्त एक मैदानकर्मी आहात, त्यापेक्षा जास्त काही नाही.”
सोमवारी इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅकुलम आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक रॉब यांनी पिच पाहणी केली होती. त्या वेळी मात्र फोर्टिस यांनी कोणतीही हरकत घेतली नव्हती. त्यामुळे भारतीय संघाने क्यूरेटरच्या दुहेरी निकषांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
भारतीय फलंदाजी प्रशिक्षक सीतांशु कोटक यांनी या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले, “क्यूरेटरने हे लक्षात घ्यायला हवं की तो अत्यंत कुशल आणि अनुभवी लोकांशी बोलतो आहे. आम्ही मैदानाची स्थिती कधीही बिघडू देत नाही. जिथे आम्ही सराव केला, तिथे स्पाइक्सचं एकही चिन्ह नाही. त्यामुळे क्यूरेटरने नम्र राहणं गरजेचं आहे.”
कोटक यांनी पुढे सांगितलं की, फोर्टिस यांनी एका भारतीय सपोर्ट स्टाफ सदस्याला कूलिंग बॉक्स मुख्य स्क्वेअरजवळ आणल्याबद्दल ओरडलं. “तो बॉक्स फारतर 10 किलो वजनाचा असेल. त्यावरूनही एवढा गोंधळ करणं योग्य नव्हतं. त्यावेळी गंभीर यांनी फक्त एवढं सांगितलं की सपोर्ट स्टाफशी अशा भाषेत बोलू नका, कारण ते मुख्य प्रशिक्षकांच्या अधीन आहेत.”
दरम्यान, माध्यमांनी विचारले असता फोर्टिस यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, “हा मोठा सामना आहे आणि त्यामुळे थोड्या भावना उफाळून येणं स्वाभाविक आहे.”
ली फोर्टिस गेल्या तीन वर्षांपासून इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाचा ‘सर्वोत्तम मल्टी-डे पिच’ पुरस्कार जिंकत आहेत. परंतु त्यांचा तुनक मिजाजी स्वभाव सर्वत्र परिचित आहे. अनेक संघांना त्यांच्यासोबत काम करताना अडचणी येतात, असंही कोटक यांनी सांगितलं.






