इंग्लंड क्रिकेट संघाला आगामी ऍशेस मालिकेआधी मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा पुन्हा एकदा दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला असून, उर्वरित संपूर्ण हंगामात तो खेळणार नाही. त्याच्या उजव्या हाताच्या कोपराला झालेल्या दुखापतीमुळे तो यापूर्वी देखील बराच काळ संघाबाहेर होता. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी काही सामने खेळून तो पुन्हा मायदेशी परतलेला. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने याबाबतची अधिकृत माहिती दिली.
We know you'll be back stronger, Jof ❤️
💬 “We wish him the best of luck with his recovery. I’m sure we'll see Jofra back to his best and winning games for England."
🎙️ @RobKey612 pic.twitter.com/vL90D4TETA
— England Cricket (@englandcricket) May 16, 2023
जवळपास दोन वर्ष क्रिकेट पासून दूर राहिल्यानंतर आर्चर याने मागील वर्षीच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. त्यानंतर यंदा तो आयपीएलमध्ये देखील खेळताना दिसला. मुंबई खेळत असताना पहिल्या सामन्यानंतर त्याची दुखापत पुन्हा एकदा चिघळली. त्यामुळे तो स्पर्धेदरम्यानच बेल्जियम येथे उपचारासाठी जाऊन आला. त्यानंतरही चार सामने खेळल्यानंतर त्याने आयपीएलमधून बाजूला होण्याचा निर्णय घेतला.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने त्याला माघारी येण्याची विनंती केलेली. आगामी ऍशेस मालिकेसाठी तो तंदुरुस्त रहावा अशी बोर्डाची इच्छा होती. मात्र, आता पुन्हा एकदा त्याच्या चाचण्या झाल्यानंतर त्याची दुखापत पूर्णपणे बरी झाली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आयर्लंड विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात तसेच ऍशेसमध्येही तो खेळणार नाही.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे अधिकारी रॉब की यांनी, तो लवकरच संघात येऊन पुन्हा एकदा विजयात आपले योगदान देईल असे म्हटले. आगामी ऍशेस मालिकेत जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, मार्क वूड, ओली रॉबीन्सन व ओली स्टोन इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजी विभागाचे प्रतिनिधित्व करतील.
(Pacer Jofra Archer Ruled Out From Ashes And Remaining Season)