पार्ल। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात शुक्रवारी (२१ जानेवारी) ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात भारताला ७ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. तसेच या सामन्यात विजय मिळवल्याने दक्षिण आफ्रिकेने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताच्या या सामन्यातील पराभवामागे अनुभवी गोलंदाजांना विकेट्स घेण्यात आलेले अपयश हे देखील एक कारण आहे. दरम्यान, भारताच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या भुवनेश्वर कुमारने देखील एक नकोसा विक्रम आपल्या नावे केला आहे.
भुवीची निराशाजनक कामगिरी
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमार याने (Bhuvneshwar Kumar) निराशाजनक कामगिरी केली. त्याने ८ षटकात ८.४० च्या इकोनॉमी रेटने ६७ धावा दिल्या. यामुळे तो एकाच संघाविरुद्ध वनडेत सर्वाधिकवेळा एकही विकेट न घेता ६० किंवा त्यापेक्षा अधिक धावा देणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ वेळा ६० पेक्षा अधिक धावा देत एकही विकेट न घेण्याची निराशाजनक कामगिरी केली आहे.
यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकराच्या (Nuwan Kulasekara) नावे देखील होता. त्याने ४ वेळा भारताविरुद्ध एकही विकेट न घेता वनडेत ६० पेक्षा अधिक धावा दिल्या आहेत.
भुवनेश्वरने आत्तापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेत १६ सामन्यांमध्ये गोलंदाजी केली आहे. यातील ८ सामन्यांत त्याने ६० पेक्षा अधिक धावा दिल्या आहेत. त्यातील ५ वेळा तो एकही विकेट घेऊ शकलेला नाही. या पाच सामन्यांमध्ये २०१३ जोहान्सबर्ग, २०२२ पार्ल (दुसरा वनडे), २०१५ कानपूर, राजकोट २०१५ आणि पार्ल २०२२ (पहिला वनडे) या सामन्यांचा समावेश आहे.
अधिक वाचा – भुवनेश्वर कुमारने शेअर केला नवजात मुलीचा पहिला फोटो; चाहते म्हणाले, ‘नाव तरी सांगा’
भारताचा पराभव
शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या वनडेत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रथम फलंदाजी करताना भारताने ६ बाद २८७ धावांचा डोंगर उभारला होता. भारताकडून रिषभ पंतने ८५ धावांची खेळी केली, तर केएल राहुलने ५५ धावांची खेळी केली. तसेच तळात फलंदाजी करताना शार्दुल ठाकूरने ४० धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून तब्राईज शम्सीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
व्हिडिओ पाहा – १००९ धावा करणारा प्रणव धनावडे आहे तरी कुठे?
दुसऱ्या डावात २८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने जानेमन मलान आणि क्विंटॉन डी कॉक यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर ४८.१ षटकात ३ विकेट्स गमावत २८८ धावा करत सामना जिंकला. मलानने ९१ धावांची, तर डी कॉकने ७८ धावांनी खेळी केली. त्यांना कर्णधार तेंबा बावूमा (३५), एडेन मार्करम (३७*) आणि रस्सी वॅन डर ड्यूसेन (३७*) यांनी चांगली साथ दिली.
महत्त्वाच्या बातम्या –
बीसीसीआयकडून विराटला मिळणार होती कारणे दाखवा नोटीस? गांगुलीने दिले स्पष्टीकरण





