दक्षिण आफ्रिका संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असून नुकताच दोन्ही संघात पहिला कसोटी सामना पार पडला आहे. कराची येथे झालेल्या या सामन्यात यजमान पाकिस्तानने ७ विकेट्सने पाहुण्या दक्षिण आफ्रिकाला पराभवाची धूळ चारली. या सामन्यादरम्यान नेहमी शांत दिसणारा दक्षिण आफ्रिकाचा कर्णधार क्विंटन डी कॉक आणि पाकिस्तानी खेळाडू हसन अली यांच्यात वाद झाल्याचा प्रकार घडला.
झाले असे की, प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका संघ अवघ्या २२० धावांवर सर्वबाद झाला होता. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा मधल्या फळीतील फलंदाज फवाद आलम याच्या झुंजार शतकामुळे पाकिस्तान संघ आघाडीवर होता. डावाच्या अंतिम टप्प्यात हसन हली आणि नुमान अली खालच्या फळीत फलंदाजी करत होते. अशात डावातील १०६ वे षटक टाकण्यासाठी दक्षिण आफ्रिकाचा गोलंदाज केशव महाराज आला.
विरोधी संघ आघाडीवर असल्याने गोलंदाज केशव महाराजसह दक्षिण आफ्रिका संघातील इतर खेळाडूही दबावाखाली होते. त्यामुळे केशव महाराजने अतिशय वेगाने चेंडू टाकला आणि सरळ हसन अलीची दांडी उडवली. परंतु गोलंदाजी करताना त्याचा पाय क्रिजच्या आत राहिल्याने पंचांनी तो नो बॉल असल्याचे घोषित केले.
त्यानंतर यष्टीमागे उभा असलेला क्विंटन डी कॉक स्वत:शी काही तरी कुजबुजला. हे ऐकून फलंदाजी करत असलेल्या हसन अलीचा पारा चढला. यामुळे हसन अली आणि क्विंटन डी कॉक यांच्यात बाचाबाची झाली. अखेर पंचांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांच्यातील वाद मिटला आणि सामना पुन्हा सुरू झाला.
या प्रकरणानंतर पुढे १०८.५ षटकात दक्षिण आफ्रिकाचा अनुभवी गोलंदाज कागिसो रबाडा याने हसन अलीला त्रिफळाचीत केले. त्यामुळे ३३ चेंडूत २१ धावा करत हसन अली पव्हेलियनला परतला.
Fight between Quinton de kock and Hasan ali😳🙄 pic.twitter.com/Q5StvK8WcU
— خ (@2234Kh) January 28, 2021
पाकिस्तानचा सोपा विजय
सामन्याविषयी बोलायचे झाले तर, दक्षिण आफ्रिका संघाला पहिल्या कसोटी सामन्यात खास कामगिरी करता आली नाही. पहिल्या डावात पाकिस्तानने १५८ धावांची आघाडी मिळवल्यानंतर दक्षिण आफ्रिकाचा दुसरा डाव २४५ धावांवर संपुष्टात आला. यासह पाकिस्तानला दुसऱ्या डावात नाममात्र ९० धावांचे आव्हान मिळाले. ३ विकेट्स गमावत पाकिस्तानने हे आव्हान पूर्ण केले आणि सामना खिशात घातला.
महत्त्वाच्या बातम्या-
जसप्रीत बुमराह करतोय अनिल कुंबळेप्रमाणे फिरकी गोलंदाजी, बीसीसीआयने शेअर केला व्हिडीओ
ब्रेकिंग! सौरव गांगुलीला दुसऱ्या अँजिओप्लास्टीनंतर हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज