आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024 चा दुसरा सामना गट ‘अ’ मधील पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानची कामगिरी जबरदस्त होती. संघाने श्रीलंकेचा 31 धावांनी पराभव करत आपल्या विश्वचषक मोहिमेची शानदार सुरुवात केली आहे. पहिल्या डावात खेळताना पाकिस्तान संघाने 20 षटकांत सर्व गडी गमावून 116 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ पूर्ण षटके खेळून 9/85 धावाच करू शकला. भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या विजयाने पाकिस्तानचे मनोबल नक्कीच उंचावले असावे. पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना (20 चेंडूत 30 आणि 2/10) हिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर गुल फिरोझा केवळ 2 धावा करू शकली आणि तिची जोडीदार मुनिबा अलीने 11 धावांचे योगदान दिले. सिद्रा अमीनही काही विशेष करू शकली नाहा. ती केवळ 10 चेंडूत 12 धावा केल्यानंतर बाद झाली. ओमामा सोहेलने 18, तर निदा दारने 22 चेंडूत 23 धावा केल्या. त्यामुळे 100 धावांची धावसंख्याही पाकिस्तानसाठी कठीण होईल असे वाटत होते, मात्र अखेरच्या षटकांमध्ये फातिमा सनाची तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली. तिने 20 चेंडूत आक्रमक 30 धावा केल्या. श्रीलंकेसाठी उदेशिका प्रबोधिनी आणि सुगंधिका कुमारी यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले.
Quick runs with the bat, crucial wickets with the ball – Fatima Sana led by example in her first Women’s #T20WorldCup match as captain 👏
She wins the @aramco POTM award 🎖️ pic.twitter.com/8tL5ougFxe
— ICC (@ICC) October 3, 2024
लक्ष्याचा पाठलाग करताना तिसऱ्याच षटकात श्रीलंकेला पहिला मोठा धक्का बसला. कर्णधार चमारी अटापट्टू अवघ्या 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर विश्मी गुणरत्नेसह काही विकेट झटपट पडल्या. गुणरत्नेच्या बॅटमधून 20 धावा आल्या. इतर फलंदाजांमध्ये केवळ नीलाक्षिका सिल्वा दुहेरी आकडा गाठण्यात यशस्वी ठरली. तिने सर्वाधिक 22 धावा केल्या. याशिवाय कोणीही महत्त्वाचे योगदान देऊ शकले नाही. पाकिस्तानकडून सादिया इक्बालने सर्वाधिक तीन बळी घेतले.
चमकदार कामगिरी करुन श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवणाऱ्या पाकिस्तान संघासमोर पुढील आव्हान भारतीय संघाचे आहे. या दोन संघांमधील सामना 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ज्यासाठी चाहत्यांमध्ये आधीच उत्सुकता आहे.
हेही वाचा-
इराणी चषकातील द्विशतकानंतर सरफराज खानची सूचक पोस्ट, कोणावर साधला निशाणा?
“हार्दिक पांड्या 18 कोटी रुपयांचा खेळाडू नाही”, माजी मुख्य प्रशिक्षकाचं धक्कादायक वक्तव्य
टी20 विश्वचषकात हिजाब घालून उतरली खेळाडू, पाकिस्तानशी आहे खास संबंध