2024 पाकिस्तान चॅम्पियन्स कपला 12 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. या स्पर्धेत बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शाहीन शाह आफ्रिदी आणि शादाब खान सारखे अनेक मोठे खेळाडू खेळत आहेत. रविवारी स्टॅलियन्स आणि मार्कहोर्स यांच्यात एक रोमांचक सामना झाला, ज्यामध्ये बाबर आझम चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. फैसलाबादच्या इक्बाल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात बाबर आझमनं युवा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानीला सलग पाच चौकार ठोकले.
50 षटकांच्या सामन्यात बाबर आझमच्या संघासमोर विजयासाठी 232 धावांचं लक्ष्य होतं. बाबर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्यानं बेधडक शॉट्स खेळायला सुरुवात केली. डावाचं आठव्या षटक टाकायला 26 वर्षीय वेगवान गोलंदाज शानवाज दहानी आला. बाबरनं षटकाचा पहिला चेंडू डॉट जाऊ दिला. यानंतर त्यानं पुढचे सर्व चेंडू सीमारेषेपार धाडले. बाबरनं शॉर्ट बॉलपासून ते फुल लेन्थ बॉल पर्यंत सर्व प्रकारच्या चेंडूंचा सामना केला. त्यानं स्क्वेअर ड्राइव्ह तसेच पुल शॉटही मारला.
बाबर आझमनं या सामन्यात 45 चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीनं 45 धावा केल्या. जोपर्यंत तो क्रीजवर होता, तोपर्यंत स्टॅलियन्स सामना जिंकेल असं वाटत होतं. परंतु लवकरच परिस्थिती बदलली. बाबर पुल शॉट खेळण्याच्या प्रयत्नात लेगस्पिनर जाहिद महमूदच्या चेंडूवर बाद झाला. नसीम शाहनं शॉर्ट फाईन लेगवर त्याचा सोपा झेल घेतला. जाहिद महमूदनं या सामन्यात 18 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. बाबर आझम बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या 23.4 षटकात 105 धावा होती. इथून स्टॅलियन्सनं 8.4 षटकांत केवळ 26 धावांत शेवटचे 8 गडी गमावले.
बाबर आझम सध्या या स्पर्धेतील दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्यानं दोन सामन्यांत 60.50 च्या सरासरीनं 121 धावा केल्या. मार्कहोर्सनं दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं. तर स्टॅलियन्स संघ दुसऱ्या स्थानी आहे.
हेही वाचा –
भारतीय क्रिकेटचा पुढील सुपरस्टार कोण? ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केली निवड
भारत-बांगलादेश कसोटी मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक; कधी आणि कुठे होणार सामने? सर्वकाही जाणून घ्या
पाकिस्तानात विराट कोहलीची जबरदस्त क्रेझ! खास फोटो झाला व्हायरल