पाकिस्तानचा माजी कर्णधार युनिस खानची पाकिस्तानच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. ही निवड २०२२मध्ये होणाऱ्या आयसीसी टी२० विश्वचषकापर्यंत असणार आहे. या निवडीची घोषणा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने गुरुवारी केली.
पाकिस्तानकडून कसोटीत १० हजार धावा करणारा युनिस खान हा एकमेव फलंदाज आहे. त्याने ११८ कसोटी सामन्यात ५२.०५च्या सरासरीने १००९९ धावा केल्या आहेत. ” पाकिस्तान क्रिकेट बोर्ड युनिस खानच्या अनुभवाचा व कौशल्यांचा संघासाठी उपयोग करेल. तसेच तो जेव्हा संघासोबत नसेल तेव्हा तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्थानिक पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंना मदत करेल. ” असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ वसिम खान प्रसिद्धी पत्रकात म्हणाले.
“अनुभवी माजी खेळाडूंना विविध स्तरावरील क्रिकेटमध्ये प्रशिक्षक म्हणून संधी देण्याची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची योजना आहे. जास्तीत जास्त चांगले क्रिकेटर देशात घडावेत या यापाठीमागील उद्देश आहे.” असे यावेळी खान म्हणाले.
२०२२ मध्ये आयसीसी टी२० विश्वचषक ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होत आहे. तोपर्यंतचा कार्यकाळ युनिस खान यांना फलंदाजी प्रशिक्षक म्हणून मिळाला आहे.
या निवडीबद्दल युनिस खान यांनी आनंद व्यक्त केला आहे. “राष्ट्रीय संघासाठी मुख्य फलंदाजी प्रशिक्षक या जबाबदारीबरोबरच मला देशांतर्गत क्रिकेटमध्येही काम करण्याची संधी दिल्याने मला आनंद होत आहे. मला आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत क्रिकेटमध्ये काम करण्याची संधी दिल्याचा सारखाच आनंद होत आहे.” असे युनिस खानने म्हटले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दोन दिवसांपुर्वीच बाबर आझमची पाकिस्ताच्या कसोटी कर्णधारपदी निवड केल्यानंतर युनिस खान यांच्या फलंदाजी प्रशिक्षक पदी गुरुवारी निवड करत दोन मोठे निर्णय घेतले आहेत.
११ देशांत कसोटीत शतक करणारा एकमेव क्रिकेटर
४२ वर्षीय युनिस खान पाकिस्तानकडून ११८ कसोटीबरोबर तब्बल २६५ वनडे व २५ टी२० सामने खेळले आहेत. कसोटीतील ३४ शतकांबरोबर त्यांनी वनडे ७ शतकांच्या मदतीने ७२४९ धावाही केल्या आहेत. युनिस खान यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ११ देशांत शतक केले आहे. तर भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने १० देशांत कसोटीत शतक केले आहे.
वाचा- पाच नाही; सहा नाही, तब्बल १० देशांत कसोटी शतके करणारे जगातील २ फलंदाज