सध्या पाकिस्तान संघ घरच्या मैदानावर इंग्लंडचे यजमानपदावर व्यस्त आहे. ज्यामध्ये दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मुलतानमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र दुसऱ्या कसोटीत संघाने जोरदार पलटवार करत जबरदस्त विजय नोंदवला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता मात्र तिसऱ्या कसोटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या मालिकेसोबतच पाकिस्तान संघासाठी पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्येही नव्या कर्णधाराचा शोध सुरू आहे. कारण बाबर आझमने अलीकडेच कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. आता अशी माहिती मिळत आहे की यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान हा बाबरने सोडलेल्या पदावर विराजमान होण्याच्या शर्यतीत सर्वात प्रबळ दावेदार म्हणून समोर येत आहे.
बाबर आझमने गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर पाकिस्तानचे सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले होते. परंतु यावर्षी त्याच्याकडे पुन्हा एकदा पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटची कमान देण्यात आली. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला फारसे यश मिळाले नाही. तसेच त्याने फलंदाजीतही निराशाजनक कामगिरी केली. याच कारणामुळे बाबरने स्वतः कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.
आता ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॅक टू बॅक मालिकेपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) कर्णधारपदासाठी मोहम्मद रिझवानच्या नावाची चर्चा करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी पाकिस्तानच्या संघाची घोषणा केली जाऊ शकते आणि त्यानंतरच रिझवानचीही कर्णधार म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, इंग्लंडविरुद्धची तिसरी कसोटी 28 ऑक्टोबरला संपणार असून दुसऱ्या दिवशी संघाला ऑस्ट्रेलियाला रवाना व्हायचे आहे. त्यामुळे निवडकर्ते रविवारपर्यंत (20 ऑक्टोबर) पांढऱ्या चेंडूचा संघ जाहीर करतील. सूत्राने सांगितले की, “रिझवान, त्याची ज्येष्ठता, एक खेळाडू म्हणून त्याची विश्वासार्हता, देशांतर्गत क्रिकेट आणि पीएसएलमध्ये संघांचे नेतृत्व करण्याचा त्याचा अनुभव यामुळे तो पांढऱ्या चेंडूचा कर्णधार बनण्यासाठी आघाडीवर आहे.”
हेही वाचा-
ऋतुराज गायकवाड होणार कर्णधार! ईशान किशनचेही नशीब चमकणार; AUS दौऱ्याबाबत मोठे अपडेट
IND vs NZ; कसोटीच्या चौथ्या दिवशी पावसाची शक्यता! टीम इंडियाच्या अडचणीत वाढ?
बंगळुरूचे मैदान गाजवायचे असेल तर, रोहित सेनेला कराव्या लागतील या 5 गोष्टी