पाकिस्तान क्रिकेट हे नेहमी त्याच्या प्रतिभावान गोलंदाजांसाठी ओळखले जाते. वसीम अक्रम, वकार युनिस, शोएब अख्तर हे दिग्गज गोलंदाज पाकिस्तान क्रिकेटने जगाला दिले आहेत. परंतु याच क्रिकेट बोर्डाला आता आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
2009 मध्ये श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला होता. त्याचवेळी श्रीलंकेच्या खेळाडूंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर इतर देशातील क्रिकेट बोर्डांनी पाकिस्तानमध्ये क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला होता. दहशतवाद्यांच्या भीतीमुळे पाकिस्तानमध्ये क्रिकेट बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नसल्यामुळे पीसीबीचे (पाकिस्तान क्रिकेट बोर्ड) 11 वर्षांपासून मोठे नुकसान होत आहे.
बोर्डाने आता देशांतर्गत स्पर्धेत खेळणार्या 240 खेळाडूंसह अनेक अधिकाऱ्यांकडून कोरोना चाचणीसाठी पैशाची मागणी केली आहे. बोर्डाकडे कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळा व रुग्णालयाची सुविधादेखील नाही.
पाकिस्तानमध्ये 30 सप्टेंबर पासून राष्ट्रीय टी20 चॅम्पियनशिप रावळपिंडी आणि मुल्तान येथे सुरू होणार आहे. यापूर्वी, खेळाडू आणि अधिकारी यांच्या पहिल्या दोन कोरोना चाचण्या घेणे अनिवार्य आहे. पीसीबीने म्हटले आहे की, “पहिल्या चाचणीचे पैसे तुम्हालाच द्यावे लागेल तर दुसऱ्या चाचणीचा खर्च बोर्ड उचलेल.”
पीसीबीला मिळत नव्हते प्रायोजक
कोरोनामुळे सर्व पाकिस्तान क्रिकेट मालिका पुढे ढकलण्यात आल्या आहे. सप्टेंबरमध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेला स्थगिती दिल्याने बोर्डाचे नुकसान झाले आहे. जुलै महिन्यात पाकिस्तानचा इंग्लंड दौरा होता. पाकिस्तानला या दौर्यासाठी प्रायोजकदेखील मिळत नव्हते. यानंतर पेप्सी आणि मोबाइल कंपनी ‘इझी पैसा’ ने अखेर कराराला मुदतवाढ दिली.
पीसीबीने कर्मचार्यांनाही कामावरुन टाकले काढून
आर्थिक अडचणींमुळे पीसीबीने अलीकडेच आपल्या पाच कर्मचार्यांना कामावरुन काढून टाकले. बोर्डामध्ये सध्या सुमारे 800 लोक कार्यरत आहेत. सर्वांच्या कामगिरीवर लक्ष ठेवले जात आहे. अनावश्यक व खराब कामगिरी करणाऱ्या कर्मचार्यांना हटवण्यासाठी पीसीबीने पूर्ण तयारी केली आहे. दरम्यान, पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने बोर्डाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे म्हटले होते. हीच परिस्थिती कायम राहिल्यास पीसीबी 2 ते 3 वर्षेच टिकू शकेल.
भारतीय क्रिकेट संघासोबत मालिका न झाल्यामुळे झाले 663 कोटींचे नुकसान
भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील असलेल्या तणावामुळे त्यांच्यादरम्यान गेल्या काही वर्षात एकही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका नसल्यामुळे पीसीबीला सुमारे 90 दशलक्ष डॉलर्सचा (अंदाजे 663 कोटी रुपये) तोटा झाला आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यात 7 वर्षांपासून झाली नाही मालिका
भारत आणि पाकिस्तान यांच्यात डिसेंबर २०१२ मध्ये 3 वनडे सामन्यांची शेवटची वनडे मालिका खेळली गेली होती. त्यावेळी भारताला घरच्या मैदानावर 1-2 ने पराभव पत्करावा लागला होता. त्याव्यतिरिक्त गेल्या ७ वर्षात भारत आणि पाकिस्तान केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आणि आशिया चषकात आमने-सामने आले आहेत. मागच्या वर्षी वनडे विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान शेवटचा सामना झाला होता. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता.
भारत-पाकिस्तान मालिकेतून होऊ शकते 2 हजार कोटी रुपयांची कमाई
अलीकडेच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर पाकिस्तानला आर्थिक संकटातून मुक्त करण्यासाठी भारतीय संघाविरुद्ध मालिका खेळण्याविषयी बोलला होता. तो म्हणाला होता की, “या परिस्थितीत भारत-पाकिस्तानचा रिकाम्या स्टेडियममध्ये सामना व्हावा अशी माझी इच्छा आहे. जर दोन्ही देशांमध्ये 3 वनडे किंवा टी20 सामन्यांची मालिका खेळली गेली तर कोट्यावधी लोक ते घरी बसून पाहतील. अनेक कंपन्या यावर पैसे गुंतवतील. यामुळे 200 ते 300 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 1500 ते 2 हजार कोटी रुपये) कमाई होऊ शकते.”