पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या काहीच व्यवस्थित चाललेले नाही. पाकिस्तान संघ आत्ताच न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. तेव्हा तिथे टी20 आणि वनडे मालिकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानने टी20 मालिका 1-4 ने गमावली. तसेच वनडे मालिकेतमध्ये सुद्धा ते पराभूत झाले.
आता पाकिस्तान क्रिकेट मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार मोहम्मद रिजवानला न्यूझीलंड विरुद्ध टी20 मालिकेतून बाहेर केल्यामुळे तो नाराज आहे. अशातच येणाऱ्या दिवसांमध्ये वनडे संघाचे कर्णधार पद तो सोडू शकतो. रिजवान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नकवी यांच्याशी लवकरच बातचीत करणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका सूत्राने टेलिकॉम आशिया स्पोर्ट्सला सांगितले, रिजवानला संधी मिळाल्यास तो पीसीबीचे अध्यक्ष यांच्याशी बातचीत करेल आणि टी20 संघातून बाहेर केल्यामुळे त्यावर त्यांचे स्पष्ट मत जाणून घेईल. रिजवान सामन्यादरम्यान खेळाडूंच्या निवडीमध्ये अधिक लक्ष घालेल. जर त्याला असे करण्याची परवानगी मिळाली नाही, तर तो वनडे संघाचे नेतृत्व सोडू शकतो.
मोहम्मद रिजवानचे पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक आकीब जावेद यांच्याशी पटत नाही. रिजवानने न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिकेत पाच गोलंदाजांसोबत खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण पाकिस्ताननी चार गोलंदाज आणि दोन पार्ट टाइम गोलंदाज मैदानात आणले. रिजवान या गोष्टीमुळे आनंदी नव्हता की त्याला कर्णधार तर बनवले, पण प्लेइंग इलेव्हनच्या निवडीमध्ये त्याची कोणतीच भूमिका ग्राह्य धरली नाही.
मोहम्मद रिजवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये प्रदर्शन अत्यंत खराब राहिलं. स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानने करूनही पाकिस्तान स्पर्धेत एकही सामना न जिंकता बाहेर पडला.






