इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला ८ जुलैपासून कार्डिफ येथे सुरुवात झाली. अनुभवहीन इंग्लंडच्या संघाने पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाला अक्षरशा नामोहरम केले. पाकिस्तानी वंशाचा वेगवान गोलंदाज असलेल्या साकीब मेहमूदने इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. जगातील क्रमांक एकचा फलंदाज असलेला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसह चार बळी मिळवत याने पाकिस्तानी फलंदाजीचे कंबरडे मोडले.
साकीबने केला पाकिस्तानचा डाव उध्वस्त
कार्डिफ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करताना केवळ १४१ धावा बनविता आल्या. जवळपास वर्षभरानंतर इंग्लंड संघात पुनरागमन करत असलेला २४ वर्षीय वेगवान गोलंदाज साकीब मेहमूद याने पहिल्या षटकातील पहिल्या तीन चेंडूवर दोन बळी मिळवत इंग्लंडला स्वप्नवत सुरुवात करून दिली.
साकीबने पहिल्याच चेंडूवर इमाम उल हक याला पायचीत केले. त्यानंतर, तिसऱ्या चेंडूवर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला एका अप्रतिम आउट स्विंग चेंडूवर चकवून स्लीपमध्ये उभ्या असलेल्या झॅक क्राऊलीकडे झेल देण्यास भाग पाडले. सातव्या षटकात शकीलच्या रूपाने त्याने आपला तिसरा बळी मिळवला. त्याने आपली अखेरची शिकार फहीम अश्रफ याला बाद करत केली. त्याने १० षटकात ४२ धावा देऊन ४ गडी बाद केले. सामनावीर पुरस्कार त्यालाच देण्यात आला.
https://twitter.com/ICC/status/1413392515257012227
मूळ पाकिस्तानी आहे साकीब
साकिब मेहमूद हा पाकिस्तानी वंशाचा खेळाडू आहे. त्याचे पालक पाकिस्तानी असून, साकिब याचा जन्म इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे झाला. त्याने आतापर्यंत पाच वनडे सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधित्व करताना नऊ बळी मिळवले आहेत. तर, सहा टी२० सामन्यात तो केवळ तीन बळी मिळवू शकला. साकीब काउंटी क्रिकेटमध्ये लँकेशायर संघाचे प्रतिनिधित्व करतो. चेंडू दोन्ही बाजूला स्विंग करण्याच्या क्षमतेमुळे त्याची तुलना पाकिस्तानचे दिग्गज वेगवान गोलंदाज वकार युनूस यांच्याशी केली जाते.
महत्त्वाच्या बातम्या –
नव्या भिडूंसह स्टोक्सची करामत! पहिल्याच वनडे सामन्यात नेतृत्व करताना धोनीला पछाडले
श्रीलंका दौऱ्यात युजवेंद्र चहलची अग्निपरिक्षा; पाहा या दौऱ्याबद्दल काय म्हणाला भारतीय फिरकीपटू





