---Advertisement---

आफ्रिदी, वसीम बाहेर झाल्याने फिका पडला पाकिस्तानचा बॉलिंग अटॅक, भारतासाठी असेल ‘मौका मौका’!

On: शनिवार, ऑगस्ट 27, 2022 2:34 PM
Team-India-Azam-Pakistan
---Advertisement---

आशिया चषक २०२२ ची सुरुवात होण्यापूर्वी बाबर आझमच्या नेतृत्त्वाखालील पाकिस्तान संघाला २ मोठे झटके बसले आहेत. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी गुडघ्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला. त्याचा पर्यायी खेळाडू म्हणून मोहम्मद हसनैन याला संघात सहभागी केले गेले आहे. यानंतर आता ऐन स्पर्धेआधी वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीमही दुखापतीमुळे आशिया चषकाला मुकणार आहे. त्याची जागा हसन अली घेईल.

कर्णधार आझमसाठी (Babar Azam) ही चिंताजनक बाब असेल. परंतु याचा फायदा भारतीय संघाला (Team India) झाला आहे. आशिया चषकातील (Asia Cup 2022) पाकिस्तानचा पहिला सामना भारताविरुद्ध (India vs Pakistan) होणार आहे. २८ ऑगस्टला दुबईच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचे २ प्रमुख वेगवान गोलंदाज बाहेर झाल्याने पाकिस्तानची वेगवान गोलंदाजी फळी कमजोर पडली आहे, जी भारतासाठी सकारात्मक बाब असेल.

पाकिस्तानच्या संघात आता हॅरिस राउफ, नसीम शाह, मोहम्मद हसनैन, शाहनवाज दहानी आणि हसन अली हे ५ वेगवान गोलंदाज उपलब्ध आहेत. यापैकी फक्त राउफ आणि अली यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे. तर इतर तिघे गोलंदाज अनुभवहीन आहेत.

राउफने पाकिस्तानकडून ३५ टी२० सामने खेळले असून ४२ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याचा इकोनॉमी रेट ८.५१ राहिला आहे. तर हसन अलीला टी२० विश्वचषक खेळण्याचाही अनुभव आहे. त्याने पाकिस्तानकडून ४९ टी२० सामने खेळताना ६० विकेट्सची कामगिरी केली आहे. दुसरीकडे शाहनवाज दहानीने केवळ २ टी२० सामने खेळले आहेत, तर मोहम्मद हसनैनला १८ टी२० सामन्यांचा अनुभव आहे. नसीम शाहने तर आतापर्यंत टी२० क्रिकेटमध्ये पदार्पणही केलेले नाही.

आशिया चषक २०२२ साठी पाकिस्तानचा (Pakistan Updated Squad) संघ- बाबर आजम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, हसन अली (ईटीसीच्या परवानगीवर अवलंबून), नसीम शाह , मोहम्मद हसनैन, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---