स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी राहिलेला पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर यानं तीन वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपली निवृत्ती मागे घेतली आहे. त्यानं क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची घोषणा केली. या वर्षी होणारा टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी आमिरनं हा निर्णय घेतलाय.
निवृत्तीतून परतल्याची माहिती खुद्द आमिरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. ‘X’ वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं की, “पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे अध्यक्ष आणि कुटुंबीयांशी बोलल्यानंतर मी निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय घेतला.”
या वर्षी जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 विश्वचषकाचं आयोजन केलं जाणार आहे. आमिर डिसेंबर 2020 मध्ये निवृत्त झाला होता. आता त्यानं पुनरागमन केलं आहे. मात्र त्याची टी-20 विश्वचषकासाठी निवड होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आपण निवडीसाठी उपलब्ध राहणार असल्याचं खुद्द आमिरनं सांगितलंय.
31 वर्षीय आमिरनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, “माझं अजूनही पाकिस्तानकडून खेळण्याचं स्वप्न आहे. अनेक वेळा आयुष्य आपल्याला अशा टप्प्यावर आणतं जिथे आपल्याला आपल्या निर्णयांवर पुनर्विचार करावा लागतो.” आमिरनं पुढे लिहिलं की, “माझी पीसीबी अध्यक्षांबरोबर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी त्यांनी मला संघाला माझी गरज असल्याची जाणीव करून दिली. त्यानंतर कुटुंबीयांशी बोलून मीही विश्वचषकात निवडीसाठी उपलब्ध राहणार असल्याचं निश्चित केलं आहे.”
2010 च्या इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट, वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आमिरवर बंदी घालण्यात आली होती. हे तिघेही लॉर्ड्स कसोटीत स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळले होते. यानंतर तिघांनाही क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली.
यानंतर 2015 मध्ये आयसीसीनं आमिरवरील बंदी मुदतपूर्व उठवली होती. त्यानंतर त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत पाकिस्तानला 2017 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. आमिर नुकताच पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये खेळताना दिसला होता. त्यावेळी काही प्रेक्षकांनी त्याला फिक्सर-फिक्सर म्हणत चिडवलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्माच्या चाहत्यांनी हार्दिकच्या चाहत्याला धुतलं! नरेंद्र मोदी स्टेडियममधील व्हिडिओ व्हायरल