पाकिस्तान संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. उपांत्य सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलिया संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात मोक्याच्या क्षणी मॅथ्यू वेडचा झेल सोडल्याने हसन अली टीकेचा धनी ठरला होता. त्याला काही चाहत्यांनी धमक्या सुध्दा दिल्या होत्या. यानंतर हसन अली पुन्हा चर्चेत आला आहे.
पाकिस्तान आणि बांगलादेश दरम्यान खेळल्या जात असलेल्या टी२० मालिकेत वेगवान गोलंदाज हसन अलीला मोठा फटका बसला आहे. पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या हसन अलीवर आयसीसी आचारसंहिता अंतर्गत लेव्हल १ चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या आरोपा अंतर्गत त्याला १ डिमेरिट पॉइंटचा दंड ठोठावण्यात आला आहे. हसन अलीने सामन्या दरम्यान शिस्त मोडली. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. हसन अलीसोबत बांगलादेश संघालाही २० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
हे प्रकरण पाकिस्तान- बांगलादेश यांच्यातील पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील आहे. हसन अली पाकिस्तान संघासाठी १७ वे षटक टाकत होता. अलीने बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज नुरुल हसनची विकेट घेतली आणि त्याला विचित्रपणे हावभाव करत पॅव्हेलियनमध्ये जाण्यास सांगितले. या प्रकाराला आयसीसीने अनुशासनहीन मानले आहे. त्यामुळे हसन अली लेव्हल १ साठी दोषी आढळला आणि त्याला १ डिमेरिट पॉइंट देण्यात आला. २४ महिन्यांतील हसन अलीची ही पहिली मोठी चूक आहे. भविष्यातही असेच वर्तन राहिल्यास त्यावर मोठी कारवाई होऊ शकते.
शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) खेळल्या गेलेल्या पहिल्या टी२० सामन्यात पाकिस्तानने शेवटच्या षटकात शानदार फलंदाजी करत बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने ७ विकेट गमावत १२७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, खेळताना पाकिस्तान संघाने ४ चेंडू बाकी असताना ६ गडी गमावत १३२ धावा केल्या आणि सामना जिंकला. या सामन्याचा नायक हसन अली होता, त्याने शानदार गोलंदाजी करताना ३ बळी घेत सामनावीर किताब पटकावला.