तिसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 207 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तान संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 200 हून अधिक धावांचा डोंगर उभा केला आहे. बाबर आझम (Babar Azam & Sam Ayyub) आणि सॅम अयुब यांनी अर्धशतके झळकावली, तर डेथ षटकांमध्ये शादाब खानने (Shadab Khan) तडाखेबंद 46 धावांची खेळी करत मैदानात धुमाकूळ घातला.
पाकिस्तान संघाने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच कांगारू संघाविरुद्ध 200 पेक्षा जास्त धावा केल्या. यापूर्वी पाकिस्तानची ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या 198 धावा होती, जी त्यांनी याच मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात केली होती. बाबर आझम 36 चेंडूत 50 धावा करून नाबाद राहिला, तर सलामीवीर सॅम अयुबने 37 चेंडूत 56 धावांची संयमी खेळी खेळली. शादाब खानने जबरदस्त फटकेबाजी केली. शादाब पाकिस्तानी डावाच्या 14 व्या षटकात फलंदाजीला आला होता, तोपर्यंत पाकिस्तानने 4 गडी गमावून 131 धावा केल्या होत्या. शादाबने 19 चेंडूत 46 धावा कुटल्या, ज्यामध्ये त्याने 2 चौकार आणि 5 षटकार लगावले. त्याच्या या वादळी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने शेवटच्या 6 षटकांत 76 धावा वसूल केल्या.
गोलंदाजीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनची प्रचंड धुलाई झाली; त्याने 3 षटकांत तब्बल 43 धावा दिल्या. पाकिस्तानची टी-20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या 232 आहे, जी त्यांनी 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध केली होती. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांची सर्वोच्च धावसंख्या 207 आहे, जी आजच्या सामन्यात बनली. भारताविरुद्ध मात्र पाकिस्तान संघ कधीही 190 धावांचा आकडा पार करू शकलेला नाही. टीम इंडियाविरुद्ध त्यांची सर्वोच्च धावसंख्या 182 आहे.






