टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहलीचं (Virat Kohli) नेहमीच त्याच्या अनेक चाहत्यांकडून, दिग्गजांकडून कौतुक होतं असतं. कोहली मागील 17 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी करत आहे. यामुळेच आता पाकिस्तानचा सुपरस्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने (Mohmmed Amir on Virat Kohli) विराट कोहलीची भरभरून स्तुती केली आहे.
इंग्लंडमध्ये स्थलांतरित झालेल्या आमिरने ‘किंग कोहली’ला सध्याच्या काळातील नंबर 1 फलंदाज म्हटले आहे. एका काळी या दोन्ही खेळाडूंमध्ये मैदानात जोरदार टक्कर पाहायला मिळायची.
पाकिस्तानचा माजी खेळाडू मोहम्मद आमिरने ‘विस्डन क्रिकेट’शी बोलताना भारतीय सुपरस्टार विराट कोहलीची जोरदार स्तुती केली आहे. आमिर बऱ्याच काळापासून किंग कोहलीचं कौतुक करताना दिसत आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये मैदानातही सामना रंगला आहे.
कोहलीचं कौतुक करताना मोहम्मद आमिर म्हणाला, ‘विराट कोहली जगात सर्वोत्तम आहे. तो या पिढीतील नंबर 1 क्रिकेटपटू आहे. त्याची कोणतीही तुलना होऊ शकत नाही. त्याला गोलंदाजी करणे खूप कठीण आहे. मागील 15 वर्षांत भारत आणि पाकिस्तानचे सामने जेव्हाही झाले, तेव्हा विराट कोहलीमुळेच अनेक सामन्यांमध्ये टीम इंडिया वरचढ ठरली. मात्र, 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आमिरने टीम इंडियाला नक्कीच अडचणीत आणले होते.
बऱ्याच काळापासून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि मोहम्मद आमिर यांच्यातील संबंध बिघडले होते. त्यामुळेच त्याने इंग्लंडमध्ये स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी, आता तो आयपीएलमध्येही (IPL) आपले नाव नोंदवू शकतो. इंग्लंडचे नागरिकत्व मिळाल्यामुळे आता त्याचा लिलावात (Auction) समावेश होऊ शकतो. मात्र, कोणत्याही फ्रँचायझीने त्याच्यावर बोली लावली, अशी शक्यता खूप कमी आहे. सध्याच्या काळात आमिर पूर्वीसारखा प्रभावी दिसत नाही. त्याला आता इंग्लंडमध्ये खेळून स्वतःला पुन्हा सिद्ध करावे लागेल.





