भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसरा कसोटी सामना सध्या खूप रोचक वळणावर आहे. लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात तिसऱ्या दिवशी सुरुवातीला एक रंजक प्रसंग घडला. इंग्लंडचा खेळाडू बेन डकेटने (Ben Duckket) रिषभ पंतवर टीका (Rishbh Pant) करण्याचा प्रयत्न केला, पण पंतने असं उत्तर दिलं की डकेटची बोलती बंद झाली.
तिसऱ्या दिवसाची सुरुवात रिषभ पंत आणि केएल राहुल यांनी केली. दोघेही फलंदाज खेळपट्टीवर टिकून खेळत होते. त्याचवेळी बेन डकेटने फिल्डिंग करताना रिषभ पंतच्या सावध खेळावर टोमणा मारला. डकेटने विचारलं, तू सामना ड्रॉ करण्यासाठी खेळतोयस का? यावर भारतीय विकेटकीपर पंतने सडेतोड प्रत्युत्तर दिलं. पंतने इंग्लंड संघाच्या संथ फलंदाजीवरच तिरकस टिप्पणी केली.
पंत म्हणाला की, तो इंग्लंडप्रमाणेच हळू खेळतोय. सामान्यपणे इंग्लंड संघ वेगवान फलंदाजीसाठी ओळखला जातो, पण तिसऱ्या कसोटी सामन्यात तसं दिसलं नाही. इंग्लंडने सावधपणे खेळत 112.3 षटकांत 387 धावा केल्या. इंग्लंडने अशी संथ फलंदाजी करून नंतर पंतच्या खेळावरच प्रश्न उपस्थित करणं थोडं विचित्रच होतं.
रिषभ पंतचा तगडा फॉर्म तिसऱ्या कसोटी सामन्यात दिसून आला. त्याने संयम दाखवत फलंदाजी केली आणि काही प्रसंगी दमदार फटकेही मारले. याचबरोबर त्याने त्याचं अर्धशतक देखील पूर्ण केलं. विशेष म्हणजे पंतने षटकार मारून 50 धावांचा टप्पा गाठला. त्याला केएल राहुलकडूनही चांगला पाठिंबा मिळाला. पंतच्या बोटाला दुखापत असूनही त्याने उत्तम फलंदाजी केली पण नंतर तो धावबाद झाला.






