पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा समारोप झाला आहे. हे ऑलिम्पिक भारतासाठी संमिश्र राहिलं. भारताच्या खात्यात एकूण 6 पदकं जमा झाली, ज्यात 5 कांस्य आणि 1 रौप्य पदकाचा समावेश आहे. यावेळी भारताला एकही सुवर्णपदक मिळवता आलं नाही. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत पदकांचा दुहेरी आकडा पार करेल, अशी अपेक्षा होती, मात्र तसं होऊ शकलं नाही. या ऑलिम्पिकमध्ये कोणत्या देशानं सर्वाधिक पदकं जिंकली आणि भारत पदकतालिकेत कितव्या स्थानी राहिली, हे या बातमीद्वारे जाणून घेऊया.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेनं सर्वाधिक 126 पदकं जिंकली, ज्यात 40 सुवर्ण, 44 रौप्य आणि 42 कांस्य पदकांचा समावेश आहे. यानंतर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनच्या खात्यात एकूण 91 पदकं जमा झाली ज्यात 40 सुवर्ण, 27 रौप्य आणि 24 कांस्य पदकांचा समावेश आहे. तिसऱ्या क्रमांकावर जपान राहिल, ज्यानं 20 सुवर्ण पदकांसह एकूण 45 पदकं जिंकली.
पॅरिस ऑलिम्पिकच्या पदकतालिकेत भारत 6 पदकांसह 71व्या स्थानी राहिला. तर केवळ एकच पदक जिंकणाऱ्या पाकिस्तानला पदकतालिकेत भारतापेक्षा वरचं स्थान मिळालं. पॅरिसमध्ये पाकिस्ताननं केवळ एक सुवर्णपदक जिंकलं, ज्यासह ते पदकतालिकेत 62 व्या स्थानावर राहिले. पदकतालिकेत कोणत्याही देशाचा क्रमांक सर्वाधिक सुवर्ण जिंकल्यानुसार ठरवला जातो.
2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं एकूण 7 पदके जिंकली होती, ज्यामध्ये एका सुवर्णपदकाचा समावेश होता. ही भारताची ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी होती. मात्र यावेळी भारताला केवळ 6 पदकांवर समाधान मानावं लागलं. महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या निर्णयानंतर भारताच्या खात्यात 7 वं पदक जमा होऊ शकतं. 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे विनेशला अंतिम सामन्यापूर्वी अपात्र घोषित करण्यात आलं होतं. यानंतर तिनं रौप्य पदकासाठी अपील केलं, ज्याचा निर्णय अद्याप येणं बाकी आहे.
हेही वाचा –
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा कसा होणार फायदा? माजी दिग्गजाने सांगितले समीकरण
सुवर्णपदक विजयाच्या आनंदावर विरजण, हेड कोचला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि…
सुवर्णपदक विजेत्या इमान खेलिफचं मोठं पाऊल, ‘पुरुष’ म्हणून हिणवणाऱ्यांना शिकवणार धडा!