नवी दिल्ली । भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने भारतीय संघाच्या माजी दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथ यांची मनसोक्त प्रशंसा केली आहे.
रेडिफ डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत पार्थिव (Parthiv Patel) म्हणाला, “जेव्हा जहीर खान (Zaheer Khan) आणि श्रीनाथ (Javagal Srinath) माझ्या पदार्पणाच्या पहिल्या मालिकेत खेळत होते, तेव्हा त्यांच्याविरुद्ध यष्टीरक्षण करणे माझ्यासाठी एक मोठे आव्हान होते.”
“खेळपट्टीमध्ये अधिक उसळी नव्हती. तुम्हाला परदेशाच्या तुलनेत भारतात यष्टीच्या मागे खूप जवळ उभे रहावे लागते. जेव्हा चेंडू रिव्हर्स स्विंग होतो, तेव्हा तुम्हाला कुठे उभे रहायचे असते, हे मी त्यावेळी शिकलो होतो,” असे पार्थिव पुढे म्हणाला.
श्रीनाथ चांगली गती, उसळी आणि योग्य लाईनने करायचे गोलंदाजी
“लोक ग्लेन मॅकग्राबद्दल (Glenn McGrath) बोलतात. परंतु जेव्हा मी पहिल्यांदा श्रीनाथविरुद्ध यष्टीरक्षण करत होतो, तेव्हा मला जाणवले की, ते चांगली गती आणि उसळीबरोबरच योग्य लाईनने गोलंदाजी करत होते. ते आपली शेवटची मालिका खेळत होता. त्यानंतर त्यांनी कोणताही कसोटी सामना खेळला नाही. आपल्या शेवटच्या मालिकेतही त्यांनी चांगली गती आणि अचूकतेने गोलंदाजी केली होती,” असेही श्रीनाथ यांची प्रशंसा करताना पार्थिव पुढे म्हणाला.
क्रिकेटमधून निवृत्ती घेत श्रीनाथ निभावतायेत सामना रेफरीची भूमिका
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर श्रीनाथ यांनी आपल्या नव्या कारकीर्दीची सुरवात एक सामना रेफरी म्हणून केली. त्यांनी सामना रेफरी म्हणून आपल्या पहिल्या सामन्याची सुरवात कोलंबो मध्ये २००६ साली श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका संघात झालेल्या एका कसोटी सामन्यापासून केली होती. ते एक खूप चांगले सामना रेफरी असल्याचे म्हटले जाते आणि या व्यवसायातही ते खूप चांगली कामगिरी करत आहेत.
श्रीनाथ यांनी २००३च्या विश्वचषकात भारतीय संघासाठी महत्त्वाची भूमिका निभावली होती. तसेच भारताच्या सलग ८व्या विजयात आपले मोलाचे योगदानदेखील त्यांनी दिले होते. श्रीनाथ यांंनी भारतीय संघाकडून ६७ कसोटी आणि २२९ वनडे सामने खेळले आहेत. त्यामध्ये श्रीनाथने कसोटीत एकूण ३०.४९ च्या सरासरीने २३६ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच वनडेत त्याने २८.०८च्या सरासरीने ३१५ विकेट्स घेतल्या आहेत. त्यांना भारतीय संघाच्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक मानले जाते.