युएईत झालेला आयपीएलचा तेरावा हंगाम संपून दोन महिने उलटत नाही तोच बीसीसीआयने पुढील हंगामाची तयारी सुरु केली आहे. त्याच अंतर्गत काल सगळ्या फ्रँचायझींनी संघात कायम ठेवलेल्या आणि संघातून करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने देखील त्यांची यादी जाहीर केली.
त्यांनी करारमुक्त केलेल्या खेळाडूंच्या यादीत भारताचा माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेलचाही समावेश होता. पार्थिव पटेलने याआधीच निवृत्ती जाहीर केल्याने तो आता आयपीएलमध्ये खेळणार नाही, हे स्पष्टच होते. त्यामुळे आरसीबीने त्याला करारमुक्त केले.
ही यादी जाहीर झाल्यानंतर आता पार्थिवने प्रतिक्रिया दिली आहे. पार्थिव पटेलने ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “निवृत्ती घेतल्यानंतर करारमुक्त केले जाणे, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. आरसीबी संघाचे आभार!”
An absolute honour to be released after being retired . … thank you @RCBTweets
— parthiv patel (@parthiv9) January 20, 2021
दरम्यान, विराट कोहली कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने त्यांच्या संघातील १२ खेळाडूंना कायम केले आहे. तर १० खेळाडूंना मुक्त केले आहे. कायम केलेल्या खेळाडूंमध्ये कर्णधार विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पड्डीकल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, ऍडम झम्पा, शाहाबाज अहमद, जोश फिलिप, केन रिचर्डसन आणि पवन देशपांडे यांचा समावेश आहे.
तर करारातून मुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये मोईन अली, शिवम दुबे, गुरकिरत सिंग मन, ऍरॉन फिंच, ख्रिस मॉरिस, पवन नेगी, इसरु उडाना आणि उमेश यादव यांचा समावेश आहे. पार्थिव पटेल निवृत्त झाल्याने आणि डेल स्टेन उपलब्ध नसल्याने संघातून मुक्त झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
पोर्तुगालचा ख्रिस्तीयानो रोनाल्डो ठरला सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू, या दिग्गजांना टाकले मागे
ब्रिस्बेन कसोटीबाबत असलेला अति आत्मविश्वास नडला, माजी फलंदाजाने घेतली क्रिकेट ऑस्ट्रेलियाची शाळा






