भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला बुधवारी (९ डिसेंबर) अलविदा केला. २००२ साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या पार्थिवने तब्बल १८ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले व अखेर बुधवारी बुट खुंटीला टांगले.
परंतू याच पार्थिवला एकेवेळी क्रिकेट मालिकेत निवड झाल्यामुळे व क्रिकेटच पहिलं प्रेम असल्यामुळे बारावीच्या परिक्षेला मुकावे लागले होते, हे फारसे कुणाला माहित नाही. ऑगस्ट २००२मध्ये पार्थिवची पहिल्यांदा भारतीय संघात निवड झाली होती. तेव्हा तो काही सामने भारतीय कसोटी संघाचा नियमीत सदस्य होता. २००२ साली त्याने ७ कसोटी सामने खेळले होते.
त्यानंतर त्याला भारतीय वनडे संघात २००३मध्ये स्थान मिळाले. ४ जानेवारी २००३ रोजी तो आपला पहिला वनडे सामना न्यूझीलंड देशात न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळला. तेव्हा पार्थिव बारावीला होता व गुजरात बोर्डाच्या बारावीच्या परिक्षा त्यावेळी होणार होत्या तर टीम इंडिया फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेत विश्वचषकासाठी जाणार होती. तसेच एप्रिल महिन्यात बांगलादेशात टीव्हीएस कप तिरंगी मालिका खेळवली जाणार होती.
पार्थिवची निवड दोन्ही वेळा संघात झाली होती. २००३ विश्वचषकात निवड झालेल्या १५ खेळाडूंपैकी केवळ १२ खेळाडूंना प्रत्यक्ष सामने खेळण्याची संधी मिळाली. संजय बांगर, अजित आगरकर व पार्थिवला मात्र एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर केवळ १६ दिवसांच्या गॅपने भारतीय संघ कोलकात्यावरुन बांगलादेशात तिरंगी मालिका खेळण्यासाठी रवाना झाला. त्यामुळे पार्थिवला बारावीची परिक्षा देणं शक्यही नव्हतं.
अशावेळी पार्थिवच्या आई वडिलांनी तडक तेव्हाचे गुजरातचे शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली. तसेच पार्थिवला खास बाब म्हणून परिक्षेला नंतर बसण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली.
तेव्हाचे गुजरात शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष म्हणाले होते की, ‘अशी आमच्याकडे परत परिक्षा देण्याची उपाययोजना नाही. आम्ही जास्तीत जास्त एखादा पेपर जुलै महिन्यात देण्यासाठी पार्थिवला मदत करु शकतो.’
यावर तेव्हा जेमतेम १८ वर्षांच्या पार्थिवने समजूतदारपणा दाखवला होता. तसेच तो म्हणाला होता, ‘मला शिक्षण नक्कीच महत्त्वाचे आहे. परंतू क्रिकेटमध्ये कारकिर्द करायची असेल तर झोकून द्यावे लागते. तसेच मला याचसाठी काही देशांतर्गत सामने खेळायचे आहे. त्यामुळे मला सध्यातरी परिक्षा देणं शक्य होणार नाही. मी पुढच्या वर्षी परिक्षा नक्की देणार आहे.’
पुढे पार्थिवचे बारावीची परिक्षा दिली किंवा नाही याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही परंतू त्याने टीम इंडियाकडून मात्र २५ कसोटी सामने, ३८ वनडे सामने व २ टी२० सामने खेळले.
पार्थिव पटेलशी संबंधीत लेख व बातम्या-
–निवृत्तीनंतर पार्थिव पटेलवर शुभेच्छांचा वर्षाव; पहा काही दिग्गजांचे हटके ट्विट
–अवघ्या अठराव्या वर्षी पार्थिव पटेल खेळला चक्क विश्वचषक; वाचा कशी झाली कारकिर्दीची सुरुवात
–अठरा वर्षांची छोटीशी; क्रिकेट कारकीर्द खेळलेला पार्थिव पटेल
–छोटा पॅक बडा धमाका! तुम्हाला पार्थिव पटेलबद्दलच्या या खास गोष्टी माहितीये का?