इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. या हंगामातील अव्वल ४ संघ मिळाले असून आता प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होईल. दरम्यान, या हंगामात सर्वाधिक प्रभावित करणाऱ्या फलंदाजांमध्ये पंजाब किंग्स संघाचा कर्णधार केएल राहुलचे देखील नाव आहे. तो सध्या या हंगामात साखळीफेरीनंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. याबरोबरच त्याच्या नावावर एक विक्रमही झाला आहे.
केएल राहुलने या हंगामात १३ सामन्यांत ६२.६० च्या सरासरीने ६ अर्धशतकांसह ६२६ धावा केल्या. यात नाबाद ९८ धावा ही त्याची सर्वोच्च खेळी ठरली. त्याचा पंजाब किंग्स संघाने या हंगामात केलेल्या एकूण धावांमध्ये ३३.० टक्के वाटा होता. त्यामुळे तो असा पाचवाच खेळाडू ठरला, ज्याने ३०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करताना एका आयपीएल हंगामात त्याच्या संघाने केलेल्या एकूण धावांमध्ये तब्बल एक तृतीयांश वाटा उचलला.
यापूर्वी असा कारनामा शॉन मार्श, डेविड वॉर्नर, ख्रिस गेल आणि विराट कोहली यांनी हा कारनामा केला आहे. यातील गेल आणि वॉर्नर यांनी प्रत्येकी २ वेळा असा कारनामा केला आहे. एका आयपीएल हंगामात एखाद्या संघांच्या एकूण धावांमध्ये सर्वाधिक टक्के वाटा उचलणाऱ्या खेळाडूंमध्ये शॉन मार्श अव्वल क्रमांकावर आहे. त्याने २००८ साली पंजाब संघासाठीच ११ सामन्यांत ६१६ धावा केल्या होत्या. त्यावेळी त्यानं पंजाबच्या एकूण धावांमध्ये ३७.२ टक्के वाटा उचलला होता.
एका आयपीएल हंगामात एखाद्या संघाच्या एकूण धावांमध्ये सर्वाधिक टक्के वाटा उचलणारे खेळाडू (कमीत कमी ३०० धावा केल्यानंतर)
३७.२% – शॉन मार्श (२००८)
३७.१% – डेविड वॉर्न (२०१९)
३४.५% – ख्रिस गेल (२०११)
३४.०% – विराट कोहली (२०१६)
३३.३% – ख्रिस गेल (२०१२)
३३.२% – डेविड वॉर्नर (२०१६)
३३.०% – केएल राहुल (२०२१)
पंजाब प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर –
आयपीएल २०२१ च्या प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यात पंजाब किंग्स संघाला अपयश आले आहे. कर्णधार केएल राहुलने शानदार कामगिरी केल्यानंतरही संघ १४ पैकी ६ सामन्यांत विजय आणि ८ सामन्यांत पराभव मिळवत १२ गुणांसह गुणतालिकेत ६ व्या क्रमांकावर राहिला.
असे होतील प्लेऑफचे सामने
आयपीएल २०२१ हंगामाच्या प्लेऑफमध्ये दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स या चार संघांनी प्रवेश केला आहे.
आता १० ऑक्टोबरला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या गुणतालिकेतील अव्वल दोन संघात पहिला क्वालिफायर सामना पार पडेल. या सामन्यात जिंकणारा संघ थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. तर, पराभूत होणाऱ्या संघाला आणखी संधी मिळेल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात ११ ऑक्टोबरला एलिमिनेटरचा सामना पार पडेल. या सामन्यात विजय मिळवणारा संघ पहिल्या क्वालिफायरमधील पराभूत संघाविरुद्ध १३ ऑक्टोबरला दुसऱ्या क्वालिफायरमध्ये खेळेल. या सामन्यात जिंकणारा संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल. अंतिम सामना १५ ऑक्टोबरला होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सावळा गोंधळ! विकेट वाचवण्याच्या नादात भारतीय फलंदाज धावल्या एकाच दिशेला, अंपायरलाही पाडले पेचात
“केएल राहुलकडे चौफेर फटकेबाजीची रोहित शर्मा आणि विराट कोहलीपेक्षा जास्त क्षमता”